देशविदेश

नवे कृषिकायदे रद्द करा: अर्थतज्ज्ञांचे कृषिमंत्र्यांना पत्र

Share Now

नवी दिल्ली: नवे कृषी कायदे चुकीच्या गृहीतकांवर आधारीत असल्याने त्यांच्या माध्यमातून कृषी विपणन प्रक्रियेत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे हे कायदे रद्द करावे, अशी मागणी अनेक अर्थतज्ज्ञांनी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अनेक विद्यापीठातील आजी- माजी प्राध्यापक आणि अर्थतज्ज्ञांनी या पत्रावर सह्या केल्या आहेत

कृषी मालाच्या विपणनामध्ये मोठ्या सुधारणांची आवश्यकता आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी कायद्यांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. मात्र, सध्या सरकारने आणलेले कायदे हे काम करण्यास असमर्थ आहेत, असे या पात्रात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने ५ कारणे पत्रात निदर्शनास आणून दिली आहेत.

या कायद्यांमुळे कृषीमालाच्या बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याच्या राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे. वास्तविक शेतकऱ्यांसाठी स्थानिक यंत्रणा सहज उपलब्ध असतात आणि त्या अधिक कार्यक्षमही ठरतात. दुसरे म्हणजे, या कायद्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पलीकडची कृषिमालाची अनियंत्रित बाजारपेठ निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषिमालाच्या बाजारपेठेतील अनिष्ट फेरफार (मॅनिप्युलेशन्स) रोखण्यासाठी कृषीउत्पन्न बाजार समित्या उभारण्यात आल्या आहेत. अनियंत्रित बाजारपेठेत त्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, हे या अर्थतज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील दैनंदिन लिलावामुळे कृषिमालाच्या किंमतीचा एक मापदंड घातला जातो. या उलट अनियंत्रित बाजारपेठेत स्थानिक पातळीवर मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका असतो. बिहारमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा रद्द झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे, याकडे अर्थतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

लहान शेतकरी आणि कंपन्या यांच्या क्षमतांमध्ये प्रचंड असमानता असल्याने कंपन्या अलिखित व्यवस्था निर्माण करून लहान शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याची शक्यता आहे. कृषिमालाच्या किंमती निश्चित करण्याच्या यंत्रणांचे केंद्रीकरण झाल्याने ‘गेट बिग ऑर गेट आउट’ या तत्वानुसार छोटे शेतकरी, छोटे व्यापारी आणि स्थानिक शेती-व्यवसाय धोक्यात येतील. अनेक देशांमध्ये हे यापूर्वी घडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, काही कलमांमध्ये वरवरच्या सुधारणा करून शेतकऱ्यांचे हित साधले जाणार नाही, असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.


Share Now
error: Content is protected !!