वस्तू व सेवा कर विभागाच्या पुनर्रचनेमुळे गैरसोय – धाराशिव जिल्हा पुन्हा सोलापूर विभागाशी जोडावा – व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार संघटनांची मागणी

2 Min Read

धाराशिव, दि. 11 –

राज्य वस्तू व सेवा कर विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता व कोणतेही कारण नसताना अन्यायकारक पुनर्रचना करण्याचा घाट घातला आहे. याचा जिल्ह्यातील हजारो व्यापारी व उद्योजकांना फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा पुन्हा सोलापूर विभागीय कार्यालयाला जोडून सध्या करण्यात आलेली पुनर्रचना रद्द करावी, अशी मागणी जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार व सराफ संघटनांनी केली आहे.

धाराशिव जिल्हा हा यापूर्वी सोलापूर विभागीय कार्यालयाला जोडला गेला होता. जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व कर सल्लागार आपल्या विविध कामांसाठी सोलापूर येथे जात होते. परंतु अचानक या सर्व विभागांची पुनर्रचना करण्यात येत आहे. आता जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांना आपल्या विविध कामांसाठी संभाजीनगर, कोल्हापूर व नांदेड, असा द्रविडी प्राणायाम करावा लागणार आहे. यामुळे व्यापारी व उद्योजकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ही पुनर्रचना रद्द करून पुर्ववत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मंगळवारी प्रभारी सहाय्यक राज्य कर आयुक्त नागनाथ शिंदे, राज्य कर अधिकारी दत्तात्रय निपाणीकर यांना व्यापारी व कर सल्लागार संघटनेच्यावतीने देण्यात आले.

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

- Advertisement -

या कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल दुरूगकर, कैट राज्य व्यापारी संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय मंत्री, मशीनरी असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश काळे, सचिव शैलेश शहा, कर सल्लागार संघटनेचे सचिव तथा सीए. दीपक भातभागे, उपाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र कदम, इंद्रजित आखाडे, महेश मिणियार, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष कपील शर्मा, तालुकाध्यक्ष संताजी मुंडे, प्रकाश खंडेलवाल, तसेच व्यापारी संघाचे सदस्य प्रमोद पडवळ, अभय राजे, कुणाल मेहता, प्रशांत पाटील, चंद्रकांत इंगळे आदी उपस्थित होते.

Share This Article