maharashtra

मोदी सरकार श्रेय घेण्यात गुंतल्यामुळेच भारतात कोरोनाचे संकट वाढले – अमर्त्य सेन

Share Now


नवी दिल्ली – भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसलेला असताना दूसरीकडे देशावर ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवड्याचे दुसरे संकट देखील ओढावले. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या एकूण धोरणावर टीका केली असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची भूमिका मांडली आहे. या सर्वच बाबतीत एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचे श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रीत केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि भारतात कोरोनाची ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले आहेत.

याआधी भारतातील कोरोना परिस्थितीवरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौची यांनी देखील परखड भूमिका मांडली होती. त्यानंतर आता अमर्त्य सेन यांनी देखील केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक धोरणावर ताशेरे ओढले आहेत. औषध निर्मितीच्या बाबतीत भारत समर्थ असल्यामुळे कोरोनाच्या साथीचा भारत योग्य प्रकारे सामना करू शकला असता. पण, सरकारी पातळीवर असलेल्या संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रीत करू शकलो नसल्याचे ते म्हणाले. अमर्त्य सेन शुक्रवारी मुंबईत राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर देखील यावेळी बोलताना हार्वर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्र आणि तर्कशास्त्राचे प्राध्यापक असलेले अमर्त्य सेन यांनी आक्षेप घेतला. जागतिक स्तरावर आपली अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत राहिले की भारत संपूर्ण जगाला वाचवेल. पण त्याचवेळी देशात कोरोनाची समस्या वाढण्यासाठी आणि लोकांना त्याचा विळखा बसण्याकडे दुर्लक्ष करत राहिले. भारतात आधीच असलेल्या सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारी या समस्या कोरोनाच्या काळात अजूनच गंभीर झाल्या असल्याचे ते म्हणाले.

The post मोदी सरकार श्रेय घेण्यात गुंतल्यामुळेच भारतात कोरोनाचे संकट वाढले – अमर्त्य सेन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/34RZQT6
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!