maharashtra

जगातील सर्वोच्च शिखर चढू जाण्यासाठी अशी करावी लागते तयारी.

Share Now


जगातील सर्वोच्च शिखर समजले जाणारे माउंट एव्हरेस्ट चढून जाण्यासाठी काही हजार डॉलर्स खर्च करण्याची तयारी आणि उत्तम शारीरिक स्वास्थ्य आणि क्षमता या गोष्टी आवश्यक आहेतच, पण त्याशिवाय इतरही अनेक गोष्टींची आवश्यकता या जगावेगळ्या धाडसासाठी असते. दरवर्षी जगातील शेकडो हौशी गिर्यारोहक हिमालयाच्या दिशेने जाण्यास निघतात, जगातील सर्वोच्च शिखर काबीज करण्याचा इरादा करूनच. एव्हरेस्ट सर करण्याची पूर्वतयारी करण्यासाठी अनेक आठवडे खर्च होत असतात. इतक्या उंचावर चढाई करण्याचा सराव आणि अनुकूल हवामानाची वाट पाहण्यातही अनेक दिवस खर्च होत असतात. बहुतेक गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी मे महिन्याचे दिवस निवडतात. साधारण पंधरा मेच्यानंतरचा काळ एव्हरेस्ट चढाईसाठी अनुकूल समजला जातो. त्यावेळी तापमान जास्त असते, आणि उंचीवर घोंगावणाऱ्या ‘जेट स्ट्रीम्स’ वाऱ्यांच्या दिशेमध्ये परिवर्तन झाले असल्याने पर्वताच्या चढाईसाठी हा काळ अनुरूप समजला जातो. तसेच मे महिना हा पावसाळयाच्या पूर्वीचा काळ असल्याने या महिन्यामध्ये चढाई करणे योग्य ठरते. एकदा पाऊस सुरु झाला, की निसरड्या होत जाणाऱ्या मार्गांवरून चढाई करणे अवघड होते. चढाईच्या दृष्टीने हवामान अनुकूल असणे हे गिर्यारोहकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असते. हवामान अचानक खराब झाल्याने पुढील चढाई निव्वळ अशक्य होऊन अनेक गिर्यारोहाकांना बेस कॅम्प पासूनच मागे फिरावे लागल्याच्या घटना अनेकदा घडत असतात.

माउंट एव्हरेस्ट तिबेट आणि नेपाळच्या सीमेलगत आहे. एवरेस्टवर चढाई करण्यासाठी अनेक मार्ग अस्तित्वात आहेत, पण त्यातही नेपाळमधील दक्षिणेकडील मार्ग आणि तिबेट मधील उत्तरेकडील मार्ग चढाईसाठी जास्त निवडला जातो. एव्हरेस्टवर चढाई करण्याच्या कामी गिर्यारोहकांच्या मदतीसाठी उपलब्ध असणाऱ्या बहुतांश ट्रेकिंग कंपन्या नेपाळमध्ये आहेत. तिबेट मधून चढाई आरंभणे नेपाळच्या मानाने अधिक खर्चाचे असून, तिबेटमधून चढाई सुरु करण्यासाठी परवानगी सहज मिळत नाही, त्यामुळे बहुतेक गिर्यारोहकांमध्ये नेपाळमधून चढाई करण्याच्या पर्यायाला जास्त पसंती मिळत असते. नेपाळमधील ‘साउथ रूट'( दक्षिणी मार्ग)पासून चढाई सुरु करण्यासाठी गिर्यारोहक आधी काठमांडूपर्यंतचा आणि इथून लुकला गावापर्यंतचा प्रवास विमानाने करतात. लुकला गावापासूनच एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत पोहोचण्यासाठी चढाई सुरु करावी लागते.

माउंट एव्हरेस्ट वर यशस्वी चढाई करण्यासाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागतो. गिर्यारोहकांच्या सोबत त्यांचे वाटाडे आणि सामान उचलून नेण्यास मदत करणारे शेरपाही असतात. १७,००० फुटांच्या उंचीवर असलेल्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. एकदा बेस कॅम्पला पोहोचले, की गिर्यारोहक येथे काही दिवस मुक्काम करतात. हवेतील प्राणवायूच्या कमतरतेचा सराव आणि पुढील चढाईच्या दृष्टीने योग्य हवामानाची वाट पाहण्यात हा काळ खर्च होत असतो. एकदा हवामान अनुकूल झाले, की मग पुढच्या चढाईला सुरुवात होते.

माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी उत्तम शारीरिक क्षमता आवश्यक आहेच, पण त्याशिवाय ही मोहीम अतिशय खर्चिकही ठरू शकते. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी जो सरकारी परवाना आवश्यक असतो, त्याची किंमत सुमारे अकरा हजार डॉलर्स असते. त्याशिवाय ऑक्सिजन टँक्स, हाय ऑल्टिट्युड गियर, म्हणजेच इतक्या उंचीवरील हवामानाला साजेसे पोशाख, राहण्यासाठी तंबू, स्लीपिंग बॅग्ज, बर्फावरून चढाई करत असताना पायांचे संरक्षण करण्याच्या हेतूने घातले जाणारे खास बूट्स या सर्व गोष्टींचा खर्चही बराच असतो. त्याशिवाय आवश्यक औषधे, अन्नपदार्थ आणि सोबत येणाऱ्या शेरपाचा खर्चही असतोच. यंदाच्या वर्षी आतापर्यंत एव्हरेस्टवर चढाईसाठी एकूण ३८१ परवाने देण्यात आले असल्याचे नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाच्या द्वारे सांगण्यात आले आहे. पण ३८१ हा आकडा केवळ गिर्यारोहकांचा असून, त्यामध्ये सोबत जाणाऱ्या शेरपांचा समावेश नसल्याने हा आकडा अधिक असल्याचे म्हटले जात आहे.

The post जगातील सर्वोच्च शिखर चढू जाण्यासाठी अशी करावी लागते तयारी. appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3uVkxbx
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!