maharashtra

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा योगी सरकारला दणका

Share Now


अलाहाबाद – अलाहाबाद उच्च न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (एनएसए) मुद्द्यावरुन सत्ताधारी योगी सरकारला चांगलाच दणका दिला आहे. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाने जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० दरम्यान एनएसए अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भातील याचिकांवर सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान १२० पैकी ९४ प्रकरणे ही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

३२ जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालायने ९४ प्रकरणांसंदर्भात आदेश दिले असून एनएसएअंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करुन अटक करण्यात आलेल्यांची मुक्तता करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात असल्याच्या आरोपांना या निर्णयामुळे बळ मिळाले आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अगदी गोहत्येपासून ते सर्वसामान्य गुन्ह्यांसाठीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी काहीही विचार न करता एनएसए लावल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

यासंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार एनएसएअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी एक तृतीयांशहून अधिक प्रकरण ही गोहत्येशी संबंधित आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी हे अल्पसंख्याक समुदायातील आहेत. या व्यक्तींविरोधात जिल्हा प्रशासनाने प्राथमिकतेच्या आधारे गोहत्येसंदर्भातील गुन्हे दाखल केले होते. यापैकी ३० प्रकरणांमधील एनआयएचे कलम हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना सोडून देण्यास सांगितले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार संपूर्ण प्राथमिक गुन्हा अहवाल म्हणजेच एफआयआर अनेक प्रकरणांमध्ये जसाच्या तसा कॉपी केल्याचे दिसून आले आहे. एकूण नऊ प्रकरणांमध्ये एकाच एफआयआरच्या आधारे एनएसए लावण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये एका अनोखळी व्यक्तीने गोहत्येसंदर्भात माहिती दिली आणि आम्ही छापा मारल्याचे पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे. एकूण १३ प्रकरणांमध्ये शेत किंवा जंगलामध्ये गोहत्या झाल्याचे म्हटले आहे. नऊ प्रकरणांमध्ये एका खासगी घराच्या सीमेमध्ये गोहत्या करण्यात आली. तर पाच प्रकरणांमध्ये दुकानाच्या बाहेर गोहत्या करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

एकाच पद्धतीचा घटनाक्रम एनएसएच्या सहा प्रकरणांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. या गुन्ह्यांची नोंद करताना, काही अज्ञात लोकं घटनास्थळावरुन पळून गेले, असा उल्लेख आहे. पोलिसांवर या व्यक्तींनी त्यानंतर हल्ला केला. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस सुरक्षित ठिकाणी पळू लागले. या अशा वातावरणामुळे लोकांच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा येत असून या अशा आऱोपींमुळे राज्यातील वेगवेगळ्या भागांमधील शांतता, सामाजिक सौहार्दता आणि कायदा सुव्यवस्थाही बिघडत असल्याचे पोलिसांनी गुन्हा नोंदवताना म्हटल्याचे आढळून आले आहे.

The post राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा योगी सरकारला दणका appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3sVlnF0
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!