maharashtra

अमेरिकेत १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस – जो बायडेन

Share Now


वॉशिंग्टन – कोरोना व्हायरस जगभरात पुन्हा एकदा डोके वर काढत असतानाच अमेरिकेने कोरोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय घेतला आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली. १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला १९ एप्रिलपासून कोरोनाची लस घेता येईल, असे बायडेन यांनी सांगितले.

अमेरिकेने यापूर्वी, १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला होता. पण जो बायडेन यांनी मंगळवारी १ मे ऐवजी १९ एप्रिलपासूनच १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस घेता येईल, अशी घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी आम्ही १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला, असे सांगितले. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून १०० दिवस पूर्ण होईपर्यंत २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा गाठणारा आणि ६२ दशलक्ष लोकांचे पूर्णपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दुसरीकडे, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतातही लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. 18 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना कोरोनाची लस खुली करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) केली आहे. यासंदर्भात असोसिएशनने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.

The post अमेरिकेत १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस – जो बायडेन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3fOU9vT
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!