maharashtra

लसीच्या पुरवठ्यावरुन सुरु असलेले राजकारण मंत्र्यांनी बंद करावे – फडणवीस

Share Now


मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांसाठी पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत ३ दिवसांचाच लसींचा साठा शिल्लक असून केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला होता.

त्यावरून राज्य सरकारला आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले आहे. लसीबाबत केले जात असलेले आरोप चुकीचे असून राज्य सरकारमधील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचे बंद करावे, लोकांच्या जिवाशी खेळू नये, असे फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दाव्यानंतर राज्यातल्या लसीकरण कार्यक्रमाचे काय होणार? यावर चर्चा सुरू झाली होती. लसींचा पुरवठा कमी पडल्यास राज्यातील लसीकरणामध्ये खंड पडेल की काय? अशी देखील शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्या पार्श्वभूमीवर उलट राज्य सरकारवरच निशाणा साधला आहे.

लसीच्या पुरवठ्याबाबत होत असलेला आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमितपणे होत असतो. देशभरात लसींचा पुरवठा होत आहे. देशात सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. रोज साठा येत असतो. आपल्याला काही लसींची साठेबाजी करायची नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने या मुद्द्यावर करत असलेले राजकारण बंद करावे, अशा शब्दांत यावेळी फडणवीसांनी टीका केली आहे. भारत सरकार काही वेगळे नाही. या सगळ्या गोष्टी मीडियात बोलण्याऐवजी केंद्र सरकारशी चर्चा करून का करता येत नाहीत. आपले कुणी जाऊन दिल्लीत किंवा पुरवठादारांकडे जाऊन का बसत नाही. फक्त मीडियात बोलायचे आणि हात झटकायचे हे बंद व्हायला हवे. परिस्थितीचे गांभीर्य यायला हवे. प्रत्येक वेळी विरोधकांना म्हणायचे राजकारण करू नका आणि मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचे हे धंदे बंद करा. लोकांच्या जिवाशी खेळू नका, असे फडणवीस म्हणाले आहेत.

The post लसीच्या पुरवठ्यावरुन सुरु असलेले राजकारण मंत्र्यांनी बंद करावे – फडणवीस appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/31UKQ5G
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!