maharashtra

उद्धव ठाकरेंना चंद्रकांत पाटलांचे आव्हान; हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा

Share Now


पुणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. अजित पवारांच्या पंढरपुरातील सभेत तुफान गर्दी झाली होती. कोरोनासंबंधित नियमाचे यावेळी पालन करण्यात आले नसल्यामुळे विरोधकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील जनतेला निर्बंध पाळत सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केल्यानंतर काही वेळातच ही सभा पार पडली. अजित पवार पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंढरपुरात आहेत.

फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, असे आवाहन शरद पवारांनी केले. आम्ही सहकार्य करत आहोतच ना, आमचा प्रचंड विरोध होता पण एका शब्दाने बोललो का. मग आता अजित पवारांवर कारवाई करा. उद्धव ठाकरेंमध्ये आहे का हिंमत, असे आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

एकीकडे शरद पवार कोरोनाचे नियम पाळा म्हणून महाराष्ट्राला आवाहन करतात, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नियमांची धज्जी उडवली गेली आहे, नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब?, अशी विचारणा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

पवार साहेब, गुन्हा दाखल करायला सांगणार का उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध ? करणार नसाल तर आजपासून महाराष्ट्रातील कुणावरही नियम मोडल्याबद्दल सरकारला गुन्हा दाखल करता येणार नसल्याचेही दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. जी नियमावली सरकारने तयार केली होती त्यातून पंढरपूर निवडणूक वगळण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. भाजपला आपल्या उमेदवारासाठी परवानगी हवी असेल तर त्यांनाही दिली जाईल. राष्ट्रवादीसाठी वेगळा नियम नसल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

The post उद्धव ठाकरेंना चंद्रकांत पाटलांचे आव्हान; हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3s8zeqt
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!