maharashtra

राज्यात मार्चमध्ये १० हजार १११ बेरोजगारांच्या हाताला काम – नवाब मलिक

Share Now


मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांद्वारे राज्यात मार्च २०२१ मध्ये १० हजार १११ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर या वर्षात जानेवारी ते मार्चअखेर ४३ हजार ९१० बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मलिक यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://ift.tt/3hxs0Ib हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

त्याचबरोबर विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. राज्यात या विविध उपक्रमांना बेरोजगार उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे उपक्रम यापुढील काळातही प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. यासाठी नोकरीइच्छूक तरुणांनी महास्वयंम वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी, आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मलिक म्हणाले की, माहे मार्च २०२१ मध्ये विभागाकडे ४२ हजार ०४७ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात १३ हजार ०४१, नाशिक विभागात ४ हजार ५६६, पुणे विभागात १० हजार २४३, औरंगाबाद विभागात ७ हजार ८९४, अमरावती विभागात १ हजार १७९ तर नागपूर विभागात ५ हजार १२४ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे मार्चमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १० हजार १११ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार ८८९, नाशिक विभागात १ हजार ०२०, पुणे विभागात १ हजार ६८२, औरंगाबाद विभागात ३६२, अमरावती विभागात ८० तर नागपूर विभागात ७८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

The post राज्यात मार्चमध्ये १० हजार १११ बेरोजगारांच्या हाताला काम – नवाब मलिक appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3e2R1ub
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!