maharashtra

काल दिवसभरात देशात कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ

Share Now


नवी दिल्ली – कोरोनाचा उद्रेक देशात सुरूच असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी एकूण १.३१ लाख नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर, जवळपास ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

त्यातच आता तब्बल १० लाखांजवळ देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांचा एकूण आकडा पोहोचला आहे. हा आकडा सध्या ९.७४ लाख झाला असून रुग्णवाढीचा वेग असाच सुरू राहिल्यास लवकरच १० लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रात दिसत असून गेल्या १० दिवसांपासून दररोज ५० हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण होत आहे.

गुरूवारीही महाराष्ट्रात 56 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एकट्या मुंबईतून नऊ हजार नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय दिल्लीतही गुरूवारी जवळपास ७,५०० रुग्णांची भर पडली. दिल्ली-महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाचा कहर सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये काल ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून हा उत्तर प्रदेशमधील आकडाही सर्वाधिक असल्याचे समजते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

The post काल दिवसभरात देशात कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2PNgFuE
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!