maharashtra

जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Share Now


मुंबई – कोरोना संकट राज्यात पुन्हा एकदा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारकडून अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच अभ्यासावर याचा परिणाम होत असून अनेकजण परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो.

हॅशटॅगमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एमपीएससी परीक्षेचाही उल्लेख आहे. याआधी जेव्हा राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती, तेव्हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला होता. त्यामुळे राज्य सरकारने लगेचच परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. दरम्यान ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार असल्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

रविवारी (११ एप्रिल) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यातील तीन परीक्षा उपकेंद्रे बदलण्यात आली आहेत. बदललेल्या परीक्षा केंद्रानुसार उमेदवारांना परीक्षापत्र उपलब्ध करून देत असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे होणारी ऑनलाइन सत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊनही अद्याप काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झालेले नसल्यामुळे वेळापत्रक नसताना परीक्षेची तयारी कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला असून, तातडीने वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

१० एप्रिलपासून पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा विद्यापीठातर्फे ऑनलाइन पद्धतीने सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षा पद्धतीची कल्पना येण्यासाठी ५ एप्रिलपासून सराव परीक्षाही घेण्यात येत आहे. पण काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वेळापत्रक जाहीर झाले नसल्यामुळे अभ्यासक्रमाची तयारी करता येत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.

The post जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3d0Ilow
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!