maharashtra

ट्विटरवर #MaharashtraNeedsVaccine ट्रेंडिंगमध्ये!

Share Now


कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून देशात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून लसीचा अपुरा पुरवठा केला जात असल्याचा दावा वारंवार महाराष्ट्र सरकारकडून केला जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर टीका करणारे भलेमोठे पत्रच जारी केल्यानंतर या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशा वादाचं चित्र निर्माण झाले असून आता हा वाद इंटरनेटवर देखील दिसू लागला आहे.

हा वाद वाढू लागल्यानंतर आपली मते मांडण्यासाठी ट्विटरवर नेटिझन्सनी #MaharashtraNeedsVaccine या हॅशटॅगखाली मोठ्या संख्येने ट्वीट्स केले आहेत. हे वृत्त प्रकाशित करेपर्यंत या हॅशटॅगवर ५२ हजाराहून जास्त ट्वीट्स झालेले आहेत. महाराष्ट्रातील आणि विशेषत: सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीट्सचा देखील यामध्ये समावेश आहे.

महाराष्ट्राला आवश्यकतेप्रमाणे लसींचा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला होता. राज्यातील अनेक सत्ताधारी नेत्यांनी केंद्राकडे अतिरिक्त लसींचा पुरवठा करण्याची मागणी देखील केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पत्रातून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली.

त्यावरून राज्यात पुन्हा राजकीय वाद पेटला असून राजेश टोपेंनी गुरुवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेतेमंडळींनी या राजकीय वादामध्ये आपापल्या भूमिका मांडल्या. ट्विटरवर देखील दिवसभर #MaharashtraNeedsVaccine या हॅशटॅगखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला.

The post ट्विटरवर #MaharashtraNeedsVaccine ट्रेंडिंगमध्ये! appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3dTSuTw
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!