maharashtra

महिलांनी ह्या वैद्यकीय तपासण्या नियमित करून घेणे आवश्यक

Share Now


आपल्यापैकी प्रत्येकाने वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करून घेणे अगत्याचे आहे. मात्र वास्तव वेगळेच आहे. वैद्यकीय तपासणी केवळ काही आजार झाल्यानंतरच करवून घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आणि रोगाचे निदान वेळेवर न होऊ शकल्यामुळे त्यावरील उपचारांसाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करण्यापलिकडे पर्याय नसतो. ह्या परिस्थितीवर तोडगा म्हणजे वेळो वेळी वैद्यकीय तपासण्या करून घेत राहणे. ह्या तपासण्या केल्याने शरीराचे आरोग्य चांगले आहे किंवा नाही हे समजतेच, पण त्याशिवाय कुठल्याही संभाव्य रोगाची लक्षणे वेळीच ओळखली जाऊन त्यावर त्वरित उपाययोजना करता येऊ शकते. महिलांनी देखील काही विशिष्ट वैद्यकीय तपासण्या नियमितपणे करून घेणे गरजेचे आहे.

तीस वर्षांवरील सर्व महिलांनी नियमित ‘ब्रेस्ट चेकअप ‘ करवून घ्यायला हवा. विशेषतः स्तनांमधून कोणत्याही प्रकारचा स्राव होत असेल, किंवा स्तनांमध्ये गाठ जाणवून ती दुखत असेल, किंवा आकाराने वाढत असेल, तर हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्ष असू शकते. त्यामुळे महिलांनी दर सहा महिन्यांनी स्तनांची तपासणी करविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा ‘ब्रेस्ट स्क्रीनिंग’, म्हणजेच मॅमोग्राम करविणे ही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महिलांनी दरवर्षी एकदा तज्ञांकडून ‘पेल्व्हिक एक्झाम’ करविणे आवश्यक आहे. ह्यामधे महिलेची प्रजनेन्द्रीये निरोगी आहेत किंवा नाही हे समजून घेता येते. गर्भाशयाचा कर्करोग, फायब्रॉइड्स, सिस्ट किंवा एखाद्या लैंगिक आजाराचे निदान करण्याकरिता पेल्व्हिक एक्झाम आवश्यक असते.

पॅप स्मियर टेस्ट २० वर्षांवरील महिलांनी दर दोन वर्षातून एकदा करवून घेणे आवश्यक आहे. तसेच तीस वर्षांपुढील महिलांनी ही टेस्ट दर तीन वर्षांनी करविणे अगत्याचे आहे. त्याचप्रमाणे महिलांनी नियमित रक्तदाब आणि कोलेस्टेरोल तपासून घेणे गरजेचे आहे. तसेच बोन डेन्सिटी टेस्टही वर्षातून एकदा करवून घ्यायला हवी. ह्या टेस्ट द्वारे शरीरातील हाडे कितपत बळकट आहेत, ह्याचे निदान होते. तसेच हाडे कमकुवत होऊ लागली असल्याचे निदान झाल्यास त्यादृष्टीने उपाय करणे शक्य होते. वर्षातून एकदा डोळ्याची तपासणी, थायरॉईड टेस्ट ह्या तपासण्या देखील नियमाने व्हायला हव्यात.

The post महिलांनी ह्या वैद्यकीय तपासण्या नियमित करून घेणे आवश्यक appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3uFj3lQ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!