maharashtra

केसांच्या आरोग्याकरिता करा लसूणाचा वापर

Share Now

garlic
एखादा आजार, प्रदूषण, मानसिक किंवा शारीरिक तणाव, अपुरे पोषण – कारणे कोणतीही असोत, केसगळती जर जास्त प्रमाणांत होऊ लागली तर तो चिंतेचा विषय ठरू लागतो. प्रमाणाबाहेर गळणाऱ्या केसांसाठी अनेक घरगुती, प्रभावी उपाय आहेत, त्यांपैकी एक आहे केसांसाठी लसुणाचा वापर करणे. लसूण केसांच्या आरोग्याकरिता निरनिराळ्या पद्धतीने वापरता येतोच, त्याशिवाय लसूण हा प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये हटकून सापडणारा असल्यामुळे याचा वापर करणे अवघडही नाही. केवळ भोजनाचा स्वाद वाढविण्याच्या शिवाय लसूण एकंदर शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय उपयुक्त आहे. यातील तत्वांमुळे केसगळतीची समस्या देखील पुष्कळ अंशी कमी होते. अनेकांना केसांवर लसूण लावल्याने डोक्याला खाज सुटू शकते. काहीच मिनिटांमध्ये ही खाज नाहीशी होते, पण तसे न झाल्यास केसांसाठी लसूणाचा वापर टाळावा.
garlic1
लसुणात असलेली झिंक, सल्फर, आणि कॅल्शियम ही तत्वे केसांच्या आरोग्याच्या दृष्टिने चांगली असून, लसुणातील सेलेनियम हे तत्व केसांच्या मुळांशी रक्ताभिसरण वाढविणारे आहे. रक्ताभिसरण वाढल्याने केसांची मुळे मजबूत बनून केसगळती कमी होण्यास मदत होते. त्याशिवाय हे तत्व डोक्यातील कोंडा कमी करून केसांच्या मुळांशी असलेली रंध्रे खुली होण्यासही सहायक असते. केसांच्या आरोग्यासाठी लसुणाचा उपयोग निरनिराळ्या प्रकारे करता येतो. लसूण आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण केसगळती रोखण्याचे प्रभावी माध्यम आहे. खोबरेल तेल केसांसाठी चांगले आहेच, पण त्याला जर लसुणाची जोड दिली, तर हे मिश्रण केसगळतीची समस्या नक्कीच कमी करू शकते. हे मिश्रण तयार करण्यासाठी लसूणाच्या दोन पाकळ्या बारीक चिरून घ्याव्यात. थोडे खोबरेल तेल हलके गरम करून घेऊन त्यामध्ये चिरलेला लसूण घालावा, आणि पाच ते दहा मिनिटे हे तेल तसेच झाकून ठेवावे. त्यांनतर केसांच्या मुळांशी हळुवार मालिश करीत हे तेल केसांना लावावे आणि किमान अर्धा तास तसेच राहू द्यावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुवावेत.
garlic2
केसगळतीसाठी लसूण आणि मधाचे मिश्रणही उपयुक्त आहे. यासाठी लसूणाच्या आठ ते दहा पाकळ्या ठेचून त्यांचा रस काढून घ्यावा. साधारण दोन मोठे चमचे भरतील इतपत रस असावा. या रसामध्ये एक मोठा चमचा मध मिसळावा. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. केसांच्या बरोबर केसांच्या मुळांशीही हे मिश्रण सावकाश मालिश करीत लावावे. हे मिश्रण केसांवर अर्धा तास राहू देऊन त्यानंतर केस नेहमीप्रमाणे धुवावेत. केसगळती कमी होण्यासाठी हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावा. आले आणि लसुणाची पेस्ट ही केसगळती कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी एक इंच आल्याचे दोन तुकडे, आणि आठ ते दहा लसुणाच्या पाकळ्या एकत्र ठेचून घ्याव्यात. थोडे खोबरेल तेल गरम करून घेऊन त्यामध्ये आले-लसूणाचे वाटण घालावे. हे वाटण तेलामध्ये ब्राऊन होई पर्यंत तेल कढू द्यावे. त्यानंतर तेल आचेवरून बाजूला करून थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यावर गाळून घेऊन एका बाटलीमध्ये भरून ठेवावे. या तेलाने केसांना मालिश केली असता केसगळती कमी होण्यास मदत होते.

The post केसांच्या आरोग्याकरिता करा लसूणाचा वापर appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3uCWnCJ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!