maharashtra

दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची गरज महाराष्ट्राला नाही – संजय राऊत

Share Now


मुंबई – राज्यात दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज विक्रमी संख्येने वाढ होत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यातच कोरोना औषधांसह बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा विचार सुरू असून, त्याला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नकारार्थी सूर लावला आहे. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधत फडणवीसांना टोला लगावला आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी राज्यातील आणि देशातील कोरोना परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संवाद साधला. लॉकडाऊनची गरज देशात आहे की, नाही याचा निर्णय पंतप्रधान घेतील. पण काल सर्व पक्षीय नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचे मुद्दे लक्षात घेतले. त्यांनी यावेळी लॉकडाऊनची गरज असल्याचे संकेत दिलेले आहेत. केंद्राला जर वाटत आहे की, लॉकडाऊनची गरज आहे. तर पंतप्रधान मन की बात देशाला सांगतील. पण याविषयी केंद्र सरकार पश्चिम बंगालच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेऊ शकते, असे मला वाटते. पण राज्यांना जास्तीत जास्त लसींचे डोस दिले गेले पाहिजे. लोकांच्या जीवांचे रक्षण करणाऱ्या लसींचा आणि औषधांचा गैरवापर होऊ नये. गुजरातबद्दल जास्त प्रेम वाटत असेल, तर ठिक आहे, पण संपूर्ण देश तुमचा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही यावेळी राऊत यांनी निशाणा साधला. दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची गरज महाराष्ट्राला नाही. महाराष्ट्रात त्यांनी यावे. त्यांनी मुंबईत बसावे, पुण्यात बसावे, येथील परिस्थिती बघावी. देवेंद्र फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केला असेल. ती त्यांच्या पक्षाची राज्यापुरती भूमिका आहे. देशातील भूमिका वेगळी असू शकते. मोदींनी जर देशात पुन्हा लॉकडाऊन लागू केला, तर देवेंद्र फडणवीस म्हणतील का की महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन लागू करा. अशा परिस्थितीत राजकारण करणे कुणालाही शोभत नाही. लोकांचे जीव वाचवावे लागतील, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.

The post दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची गरज महाराष्ट्राला नाही – संजय राऊत appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2RqxT1r
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!