maharashtra

पेरू – तंदुरूस्तीचा स्वस्त व मस्त पर्याय

Share Now

आरोग्य किंवा आधुनिक युवा पिढीच्या भाषेत म्हणायचे तर हेल्थ किंवा फिटनेस कसा राखावा याचे शेकडो मार्ग वेळोवेळी सांगितले जात असतात. व्यायाम आणि आहार याचे त्यात अन्यन्यसाधारण महत्त्व असते. आहारात काय खावे, किती, कसे, कधी खावे याचीही माहिती सतत दिली जात असते. फळांचे आहारातील महत्त्व आपण सर्वजण जाणत असतोच. मात्र आजकाल फळांच्या किमती सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर जात आहेत. फळामधला हेल्थसाठी फायदेशीर असणारा स्वस्त व मस्त पर्याय आजपर्यंत दुर्लक्षिला गेला आहे. हे फळ आहे, बारमाही कुठेही मिळणारा पेरू.

पेरू विकले जातात ते विविध प्रकारात. म्हणजे कच्चे, अर्धवट पिकलेले आणि पूर्ण पिकलेले. आरोग्यासाठी पेरू खाताना मात्र तो पिकताच लगोलग खाल्ला गेला पाहिजे. या अल्पमोली फळांत अनेक जीवनसत्त्वे, क्षार, खनिजे आहेत आणि अनेक व्याधींवर नियंत्रण आणण्यासाठी पेरूचे सेवन उपयुक्त ठरते असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे.

पेरू खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. एका केळ्यात जितके पोटॅशियम मिळते तितकेच ते पेरूतूनही मिळते. हे पोटॅशियम सोडियमचे दुष्परिणाम कमी करते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. पेरू रक्तातील कोलेस्टोरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो व त्यामुळे रक्त दाट होत नाही. पेरूमुळे रक्तात शोषल्या जाणारया साखरेचे प्रमाण कमी होते शिवाय त्यात फायबर किवा तंतूंचे प्रमाण चांगले असल्याने मधुमेहींना पेरू उपयुक्त ठरतो. संशोधनात असे आढळले आहे की १०० ग्रॅम पेरूमध्ये फायबरचे प्रमाण ५.४ ग्रॅम असते व त्यामुळे टाईप दोनचा मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

अँटी ऑक्सिडंट म्हणून ओळखल्या जाणऱ्या सी व्हिटॅमिन किंवा क जीवनसत्वाचे प्रमाण पेरूत संत्र्याच्या चौपट असते.त्यामुळे पेरूचे नियमित सेवन कर्करोगाची शक्यता कमी करते. पेरूत आयोडिन नाही. तरीही त्यात कॉपर असल्याने पेरू थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यास मदतगार ठरतो. कॉपरमुळे हार्मोनचे उत्पादन, शोषण यथोयोग्य होते. पेरूतील मँगनीझ एन्झाईम अॅक्टीव्हेटर (संप्रेरके) म्हणून काम करते.थायमिन, बायोटिन, अॅस्कॉर्बिन अॅसिड चे प्रमाण यथोयोग्य राहते.

पेरू बी ग्रुप व्हिटॅमिनने परिपूर्ण आहे. व्हीटॅमन बी३ जे रक्तप्रवाह सुरळीत ठेवते व मेंदूचे कार्य चांगले राखते त्याचबरोबर बी ६ हे नर्व्हजसाठी उपयुकत आहे ते पेरूतून मिळते. गरोदरपणातील प्रॉब्लेम पेरूच्या सेवनाने कमी करता येतात. म्हणजे पेरूतील फोलेट वंधत्व दूर करते. डोळ्याचे आजार किवा व्याधी दूर करण्यासाठीही पेरू खावा. यातील अे व्हिटॅमिन दृष्टी सुधारण्यास मदत करते. त्वचेसाठीही पेरू उपयुक्त आहे. कारण यात असलेले ई व्हीटॅमिन त्वचेचे पोषण करण्यास मदत करते. गुलाबी पेरूत टोमॅटोच्या दुप्पट लायकोपेन असते ते त्वचेचे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून रक्षण करते. प्रोस्टेट कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठीही पेरू उपयुक्त आहे.

पेरूची पानेही औषधी गुणधर्माची आहेत. पानांचा रस सर्दी, कफ, श्वासनलिकेचे आजार व घशातील बॅक्टेरियाचा संसर्ग कमी करण्यास उपयुक्त असून पाण्यात ही पाने उकळून केलेले काढा साखरेसह प्यायल्याने हे विकार आटोक्यात येतात असेही संशोधनातून सिद्ध झाले आहे.

The post पेरू – तंदुरूस्तीचा स्वस्त व मस्त पर्याय appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3mGxFi7
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!