maharashtra

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ही झाडे असणे वास्तूसाठी शुभ

Share Now


जसजसा काळ बदलत गेला, तसतसे लोक गावे सोडून शहरांमध्ये स्थलांतरित होऊ लागले. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा किंवा मुलांसाठी उज्ज्वल भविष्याच्या आशेने म्हणा, गावाकडून शहरांमध्ये येण्याचे प्रमाण वाढू लागले. सुरुवातीला शहरांची लोकसंख्या जास्त नसल्यामुळे बैठी घरे, घराच्या आसपास अंगण आणि त्यामध्ये फुलणारी लहानशी बाग करणे शक्य असे, कारण जागेची कमतरता नव्हती. पण जसजशी लोकसंख्या वाढू लागली, तसतशी राहण्यासाठी जागा कमी पडू लागली. बैठी असलेली घरे आता उंचच उंच इमारतींमध्ये बसू लागली. घरांचे आकारदेखील लहान होऊ लागले. जिथे राहण्यासाठी जागा पुरेनाशी झाली, तिथे अंगण कुठले? त्यामुळे घराभोवती फुलणारी बागही दिसेनाशी झाली.

घराभोवती असणाऱ्या बागेचे महत्व केवळ निसर्गसौंदर्यापुरतेच मर्यादित नसे, तर काही विशिष्ट झाडे घरामध्ये किंवा घराच्या आसपास असण्याचा संबंध घरांतल्या सुबत्तेशी आणि भरभराटीशी होता. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही ठराविक प्रकारची झाडे असणे, वास्तुकारिता शुभ समजले गेले आहे. आज आपल्या घरांना अंगण नसले तरी घरामध्ये किंवा घराच्या बाल्कनीमध्ये आपण ही झाडे नक्कीच वाढवू शकतो. घरामध्ये तुळशीचे रोप असणे, ही भारतामध्ये शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला लक्ष्मीचे दुसरे रूप मानले गेले आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असून, यामुळे घरामध्ये विपती येत नाहीत असे म्हणतात. तुळशीचे रोप घरातील उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला असावे.

बांबूचे रोप घरामध्ये सुखसमृद्धी आणते अशी मान्यता आहे. तसेच घरातील नकारात्मक उर्जा ह्या रोपामुळे दूर होऊन घरामध्ये शांतता नांदते. हे रोप कोणत्याही हवेमध्ये अतिशय लवकर वाढते. त्यामुळेच हे रोप दीर्घायुष्य, उन्नती आणि सुख-समृद्धीचे प्रतिक असल्याचे म्हटले जाते. म्हणून हे रोप घरामध्ये असणे शुभ मानले गेले आहे. हे रोप घरामध्ये कुठल्याही दिशेला लावले जाऊ शकते. त्याचप्रमाणे केळीचे रोप देखील घरामध्ये सुख समाधान आणते असे म्हणतात. ह्या रोपामध्ये विष्णूचा वास असून, ह्या रोपामुळे घरामध्ये आर्थिक सुबत्ता नांदते असे म्हटले जाते. घराच्या ईशान्येला हे रोप लावावे.

तुळशीप्रमाणेच घरामध्ये हळदीचे रोप असणे देखील अत्यंत शुभ मानले गेले आहे. पूजाविधीमध्ये, औषधी म्हणून आणि सौंदर्य जपण्यासाठी हळदीचा वापर गेली अनेक शतके केला जात आहे. तसेच आवळ्याचे झाड पाप नष्ट करणारे आहे अशी मान्यता आहे. हे झाड घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पारिजातक समुद्र मंथनातून उगम पावला होता अशी आखायिका पुराणामध्ये आहे. त्यामुळे हे झाड घराजवळ असणे शुभ मानले गेले आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये जास्वंद असणे देखील शुभ मानले गेले आहे. घरामध्ये कोणत्याही दिशेला जास्वंद लावता येऊ शकते.

The post वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ही झाडे असणे वास्तूसाठी शुभ appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3sbwDvE
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!