maharashtra

भारतात रशियन बनावटीच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

Share Now


नवी दिल्ली : कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले असून जगभरातील बहुतांश देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रकोप पाहायला मिळत आहे. त्यातच जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. लसीकरणाला भारतातही सुरुवात झाली आहे. भारतात सीरमच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींचा सध्या वापर केला जात आहेत. यात आता रशियन बनावटीच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध नियामकांकडून मंजुरी मिळाली आहे.

या लसीची निर्मिती आणि वितरण औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज करणार आहे. या लसीचे दोन डोस नागरिकांना घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असणार आहे.

स्पुटनिक V लस भारतामध्ये आणण्यासाठी डॉ. रेड्डीजने ‘रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड’ यांच्यासोबत करार केला आहे. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. या दोन लसींसोबत आता आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला वेग येणार आहे.

सध्या स्थानिक पातळीवर भारतात कोविडच्या दोन लस तयार केल्या जातात. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसींचा समावेश आहे. यानंतर आता स्पुटनिक V या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. तर जॉन्सन आणि जॉन्सन सहकार्याने बायोलॉजिकल ई, नोवॅवॅक्स लस (सीरम इन्स्टिट्यूट इंडियाच्या सहकार्याने) तसेच झाइडस कॅडिलाची लस आणि भारत बायोटेकची इंट्रानेसल या लसींना देखील परवानगी मिळू शकते.

‘स्पुटनिक V’ चे लसीकरण सुरु झाल्यानंतर रशिया सरकारने आपल्या नागरिकांना दोन महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. लसीकरणाच्या बाबतीत रशियाने जगात बाजी मारली आहे. रशियात सध्या आरोग्यकर्मी, सैनिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. रशियाच्या या सल्ल्याने आता मद्यप्रेमींची चांगलीच गोची झाल्याचे दिसत आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर दारुचे सेवन न करण्याच्या सल्ल्यामागे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उद्देश असल्याचे रशिया प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

The post भारतात रशियन बनावटीच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3dcuzQ1
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!