maharashtra

का साजरा करतात गुढीपाडव्याचा सण ?

Share Now


हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. हा एक दाक्षिणात्य सण असून तो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी या दिवशी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा गुढी पाडव्यापासूनच प्रारंभ होतो.

महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने या सणाला महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ असे संबोधले जाते.

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. हा उत्सव महाभारतातील आदिपर्वात वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले, असे मानले जाते.

अयोध्येला श्रीराम परत आले. चौदा वर्षे वनवास भोगून प्रभू रामचंद्रांनी लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. अशी आजच्या दिवसाची आख्यायिका प्रचलित आहे.

गुढी या शब्दाचा तेलुगू भाषेत अर्थ ‘लाकूड किंवा काठी’ असा आहे. तसाच तो ‘तोरण’ असाही आहे. कुडी या शब्दाचा हिंदीत एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. त्यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असावा. ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी खातात. त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे आणि असे अनेक औषधीगुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदशास्रात मानले जाते. कडूनिंबाची पाने शरीराला थंडावा देणाऱ्या अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

The post का साजरा करतात गुढीपाडव्याचा सण ? appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tqHH9X
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!