maharashtra

लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घेऊ शकतात मुख्यमंत्री – अस्लम शेख

Share Now


मुंबई – राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध राज्य सरकारने लागू केलेले आहेत. शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊनही करण्यात आला. पण कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला फारसा ब्रेक लागत नसल्यामुळे आणि आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन सरकार लॉकडाऊनच्या विचारात आहे. लॉकडाऊनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, आता याला मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही दुजारो दिला आहे.

राज्यात सध्या लॉकडाऊनची चर्चा सुरू असून, अस्लम शेख यांनी यापार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हे लोकांनीही समजून घेतले पाहिजे. राज्य सरकार एका आठवड्यापासून प्रयत्न करत आहे. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असे वाटते की, आज यासंदर्भातील राज्य सरकार मोठा निर्णय घेऊ शकते.

लोकांच्या मनात लॉकडाऊन हा शब्द भीती निर्माण करतो. कारण रात्री आठ वाजता यायचे आणि लोकांसमोर बोलायचे. लोक मग या मानसिकतेतून बाहेर येत नाही. राज्य सरकारला कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे. लोकांनासोबत घेऊन लोकांचे म्हणणे ऐकून आम्हाला हे करायचे आहे. पुढील काळासाठी चांगल्या गाईडलाईन्स तयार करण्याच्या कामाला आम्ही लागलो आहोत. मला वाटत आजच यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

अजूनही महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. जम्बो कोविड सुविधा मुंबईत जशी तयार केली गेली. तशी राज्यातही तयार केली गेली पाहिजे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये बेड वाढवण्यात आले. पण, काही लोकांना खासगी रुग्णालयात जायचे असते, तिथे वेटिंग लिस्ट आहेत. पण आजही शासकीय असो वा महापालिका रुग्णालय असो, तिथे जागा उपलब्ध आहे. तिथे ऑक्सिजनही उपलब्ध आहेत.

जम्बो कोविड केंद्रात जास्तीत जास्त बेड हे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड आहेत. आताची स्थिती बघून आपण नाईट कर्फ्यू लावला. दिवसा जमावबंदी केला. वीकेंड लॉकडाऊन करुन बघितला. पण, जितकी रुग्णसंख्या कमी होणे अपेक्षित आहे, तितकी होत नसल्यामुळे सरकार सगळ्यांचे सल्ले घेत होते. त्यातून आज गाईडलाईन्स तयार होतील आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल, असेही अस्लम शेख म्हणाले.

लॉकडाऊन गाईडलाईन्स निश्चित झाल्यानंतर त्या किती दिवसांसाठी लागू केल्या जातील, हे सर्वांनाच कळेल. टास्क फोर्समधील काही लोकांचे म्हणणे होते की, लॉकडाऊन २१ दिवसांचा लावावा. काही लोकांचे म्हणणे होते की, लोकांना त्रास होईल त्यामुळे दोन आठवड्यांचा (१४ दिवसांचा) लावा. तर काहीचे म्हणणे होते एक आठवडा लावावा. कारण संक्रमणाची साखळी तुटली पाहिजे. त्यामुळे बाकीच्या सुविधा तयार करता येतील. सगळ्यांच्या सूचना घेऊनच निर्णय घेत आहोत. फक्त अधिकाऱ्यांचेच ऐकायचे असे नसल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.

The post लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घेऊ शकतात मुख्यमंत्री – अस्लम शेख appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tfewq8
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!