maharashtra

राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर राज ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र

Share Now


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर केल्यासोबतच याबाबत विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. एकीकडे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना लसींचा तुटवडा हा गंभीर मुद्दा आहे. सध्या महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी या पत्रामधून मोदींसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यांनी यामध्ये राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करावे, त्याचबरोबर खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी, अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.

मोदींना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाऊन आणि निर्बंध लावणे हा उपाय नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर १०० टक्के लसीकरण महाराष्ट्राला करण्याची गरज असल्याचे सांगताना त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करु द्यावे, अशी पहिली मागणी केली आहे.

त्याचबरोबर राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. तसेच महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी सीरमला द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी त्याचसोबत कोरोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. संपूर्ण देश आज कोरोनाच्या महामारीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट झाली असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाविरुद्ध लढायचे असेल असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरचा लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अर्थातच देशभरही याचे आर्थिक, सामाजिक पडलेले पडसाद आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, लॉकडाऊन जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?, असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.

विविध राज्यांमध्ये कोरोनामुळे वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल, असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

The post राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर राज ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2RCCDkN
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!