maharashtra

रेमडेसिवीरच्या काळ्याबाजार संदर्भात ठाकरे सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Share Now


जालना – राज्यावर कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्यामुळे बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसोबतच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यातच या इंजेक्शनची काळाबाजारात विक्री होत असल्याचे अनेक प्रकार राज्यात उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन पद्धतीने रेमडेसिवीर वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालन्यात खासगी कोविड रुग्णालयांना राजेश टोपे यांच्या हस्ते दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करण्यात आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. टोपे म्हणाले, रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीने हाफकिन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात या इंजेक्शनचा एक स्टॉकिस्ट असणार असून, त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्यामुळे त्याचा काळाबाजार होणार नाही. यातून खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल. टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नसल्याचेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पण यासंदर्भात कोणतेही राज्य मदत करायला तयार नसून, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल हाच मार्ग आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ब्रेक द चेन संदर्भातील आवाहनाला सर्वांनी सहकार्य करावे, असेही टोपे म्हणाले. ऑक्सिजनची सध्या कमतरता असून जालन्यातील घनसावंगी येथे येत्या १५ दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेणारा प्लांट उभारत असून यात यश मिळाले तर संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील आणि लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मिळेल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

The post रेमडेसिवीरच्या काळ्याबाजार संदर्भात ठाकरे सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3dhwm6o
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!