maharashtra

मुंबई महानगरपालिका कोरोनाबाधितांसाठी खाजगी हॉटेल्समधील बेड्स ठेवणार राखीव

Share Now


मुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधितांच्या उपचारासाठी बेड्सची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. मुंबई महानगरपालिकेने याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. काही खाजगी रुग्णालयांतील बेड्सही यापुढे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. तसेच आयसीयू बेड्सची गरज ज्या रुग्णांना नाही, त्यांना शुल्क आकारून हॉटेल्समध्ये ठेवण्यात येणार आहे. या स्टेपडाऊन फॅसिलिटीसाठी दिवसाला 4 ते 6 हजारांचं शुल्क आकारण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांमार्फत त्यासाठी महानगरपालिकेचा अॅक्शन प्लॉन तयार करण्यात आला आहे. मुंबईतील आरोग्य सुविधेवर मोठा ताण येत आहे. त्यातच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनीही काही खासगी रुग्णालयांमध्ये बेड अडवून ठेवले आहेत. यावर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता केवळ गरज असणाऱ्या रुग्णांनाच आयसीयू बेड उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तर आयसीयू बेड्सची गरज ज्या रुग्णांना नाही, त्यांना शुल्क आकारून हॉटेल्समध्ये ठेवण्यात येणार आहे. यासाठी खाजगी हॉस्पिटल्सची मदत घेतली जाणार आहे.

अनेकदा त्रास होऊ लागल्यावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. गरज नसतानाही काही रुग्ण बेड अडवून ठेवतात. महानगरपालिकेने त्यासाठी खाजगी रुग्णालयांचे खाजगी हॉटेल्सशी टायअप करुन दिले आहे. त्यानुसार रुग्णांना आता स्टेपडाऊन नावाची एक सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आयसीयू बेडची गरज ज्या रुग्णांना नाही, त्या रुग्णांसाठी ही सुविधा वापरली जाणार आहे.

ऑक्सिजन लेव्हल कोरोना रुग्णांमध्ये कमी झाल्यास त्यांना तातडीने उपचाराची गरज लागते. पण, अनेकदा बेड मिळत नाही. रुग्णांना रात्रीच्या वेळेस बेड मिळवताना प्रचंड त्रास होतो. लोकांना होणारा हा त्रास कमी व्हावा म्हणून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या 24 वॉर्डातील ‘वॉर रूम’ व जम्बो फिल्ड हॉस्पिटलसाठी हे नोडल अधिकारी काम करतील.

विशेषत: रुग्णांना रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत लवकरात लवकर बेड कसा मिळेल हे पाहण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे. दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा दोन शिफ्टमध्ये हे अधिकारी काम करतील. हे नोडल अधिकारी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहून रुग्णांच्या बेडची व्यवस्था करतील, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

The post मुंबई महानगरपालिका कोरोनाबाधितांसाठी खाजगी हॉटेल्समधील बेड्स ठेवणार राखीव appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tgwgBo
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!