maharashtra

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात अक्षरशः अराजक माजले आहे – अतुल भातखळकर

Share Now


मुंबई – औरंगाबादमध्ये उस्मानपुरा भागातील पीरबाजार परिसरातील एक सलून चालकाचा मृत्यू झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सलून चालक फेरोजखानला पोलिसांनी मंगळवारी रात्री अर्धवट शटर लावून आतमध्ये कटिंग, दाढी सुरू असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. त्याचा त्याच रात्री मृत्यू झाला. फेरोजखान याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. यामुळे परिसरात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

ट्विट करत अतुल भातखळकर यांनी राज्यात अक्षरशः अराजक माजले असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजले असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत फेरोजखान याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. नातेवाइकांनी शवविच्छेदनासाठीही विरोध केला होता. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे फेरोजखान याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधिताना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी लावून धरण्यात आली होती.

पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक तारे व अन्य दोन कर्मचाऱ्यांना मुख्यालयाशी जोडून घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतरही नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस निरीक्षक तारे यांच्यासह कर्मचाऱ्यांना निलंबितच करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. मात्र, मृताचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे सत्य बाहेर येईल व त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.

घटनास्थळी शहरातील काही पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी, दंगा काबू पथक आदी तैनात होते. जमावाला शांत करण्याचा खासदार इम्तियाज जलील यांनीही प्रयत्न केला. खासदार जलील यांनी पोलिसांच्या उद्घोषक यंत्रावरून शांततेचे आवाहन केले. अखेर सायंकाळी फेरोजखान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीमध्ये नेण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवली आहे. चौकशीतून पुढे जे येईल, त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

The post मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात अक्षरशः अराजक माजले आहे – अतुल भातखळकर appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/32eDWID
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!