maharashtra

पुन्हा एकदा चंपा उल्लेख करण्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी नोंदवला आक्षेप

Share Now


मुंबई – पुन्हा एकदा ‘चंपा’ उल्लेख करण्यावरुन आक्षेप नोंदवत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इशारा दिला आहे. पंढरपुरात सभेत बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना डिवचले होते. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसेच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो, असा टोला त्यांनी लगावला होता. चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना यावरुन संताप व्यक्त केला आहे.

मला अजित पवारांना एक इशारा द्यायचा आहे. मला चंपा म्हणणे त्यांच्या लोकांनी खूप दिवस थांबवले होते. कारण मी त्यांना बोलायला लागलो तर महागात पडेन, असे सांगितले होते. आता हे थांबले नाही, तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत. त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचे संकट भीषण झालेले असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी अजित पवारांना जावे लागते. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. त्यांच्या हातून निवडणूक गेल्याचे हे लक्षण आहे. ते ज्याप्रकारे बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली असल्याचे दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली की जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजप जिंकणार हे स्पष्ट असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवारांना काय झाले आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की सौ चुहे खाके बिल्ली हज को चली,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना ते म्हणाले की, कधी कधी मला आश्चर्य वाटते. माझी शरद पवारांवरील पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता मी अजित पवारांवर एम फील करणार आहे. मी काही प्राध्यापकांना त्यासाठी भेटणार आहे. एवढे सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसे काय बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे.

म्हणजे त्यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रातील जो कारखाना बंद पडेल, तो हे विकत घेणार. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पवार कुटुंबाचे किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. एवढे केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हेच उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हेच उपमुख्यमंत्री आणि उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचे राज्य आले तरी हेच उपमुख्यमंत्री असतील, असा टोला देखील लगावला.

The post पुन्हा एकदा चंपा उल्लेख करण्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी नोंदवला आक्षेप appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2QrlPwi
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!