maharashtra

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या 7 आरोपींना पुणे पोलिसांनी केली अटक

Share Now


पुणे : शहरात एकीकडे सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असतानाच या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला आहे. पुणे शहर पोलिसांकडून तो रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, 7 इंजेक्शनच्या बाटल्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. तर रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोन टोळ्या पकडून 5 आरोपींना युनिट 4 गुन्हे शाखा यांनी जेरबंद केले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णाला उपयुक्त असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा कोणी काळाबाजार करु नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाणे व शाखा यांचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.

एक व्यक्ती वाघोली परीसरात कोरोना आजारावरील उपचारासाठी पुरविण्यात येणारे रेमडेसिविर हे इंजेक्शन काळाबाजार करुन 10 हजार रु किंमतीस एक नग या प्रमाणे स्वत:चे आर्थिक फायदयाकरिता विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट -4 मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील व पोलीस अंमलदार गस्त घालत असताना पोलीस हवालदार रमजान शेख यांना मिळाली होती. औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार रोहिदास बनाजी गोरे रा.गोरेवस्ती वाघोली याच्याकडे काळ्या बाजाराने विक्री करण्यासाठी बाळगलेले 2 रेमडेसिविर इंजेक्शन सापडल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध श्रृतीका जाधव, औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईमध्ये डिमेलो पेट्रोलपंप नगररोड जवळ एक व्यक्ती रेमडेसिविर हे इंजेक्शन काळाबाजार करुन 18 हजार रूपये किंमतीस एक नग याप्रमाणे विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस हवालदार रुपेश वाघमारे यांना होती. त्याच्याकडे एक डमी गि-हाईकाला पाठविले असता मोहम्मद मेहबूब पठाण (वय 28, रा. शालीमार चौक, दौंड) याच्यासह त्याचे तीन साथीदार इम्तियाज युसूफ अजमेरी (वय- 52) रा. 27/1 सुखरे वस्ती, खराडी, चंदननगर, पुणे, परवेज मैनोद्दीन शेख (वय 36) रा. तुकाईनगर, सिध्दटेक रोड, क्रिस्टी चर्च जवळ, दौंड), अश्विन विजय सोळंकी (वय 41) रा. नं.14, वांबुरे बिल्डींग, मेन बाजार, शनि मंदिरा जवळ, येरवडा यांच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शनच्या 2 बॉटल जप्त करण्यात आल्या आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेविरुध्द दिनेश खिंवसरा, औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच यापूर्वीही भारती पोलीस स्टेशन हद्दीत दत्तनगर कात्रज याठिकाणी 11 एप्रिलला रोजी युनिट-1 गुन्हे शाखा यांनी कारवाई करुन एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून 1 रेमडेसिविरचे इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. तर युनिट-3 गुन्हे शाखा यांनी 12 एप्रिलला खडक पोलीस स्टेशन हद्दीत भवानी पेठ पुणे येथे एका व्यक्तीकडून 2 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अशा प्रकारे पुणे शहर पोलीसांकडून इंजेक्शनच्या काळाबाजारावर कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

The post रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या 7 आरोपींना पुणे पोलिसांनी केली अटक appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3abnQUm
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!