maharashtra

शिवसेनेच्या हिंदुत्वावरुन प्रवीण दरेकरांनी पुन्हा एकदा साधला निशाणा!

Share Now


मुंबई – राज्यातील विरोधकांकडून कोरोनाच्या परिस्थितीवरून सातत्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. राज्यातील भाजपचे नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या पार्श्वभूमीवर आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

या प्रकरणांकडे सरकार हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ सत्तेसाठी दुर्लक्ष करीत आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार सत्तेमुळे कमी झाली असावी, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारवर या प्रकरणावरून टीका करतानाच प्रवीण दरेकर यांनी आज मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण देखील केले.


पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निघृण हत्या केली होती. आज या हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले. पण, या प्रकरणात अद्याप दोषींना शिक्षा झाली नसल्याचा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने पालघर साधू हत्याकांड प्रकरणात गतीने तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी या प्रकरणात न्याय मिळू शकला नसल्याचे दरेकर म्हणाले.

या प्रकरणाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. हिंदुत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी झळाळते ठेवले होते. हिंदुत्वासाठी त्यांनी ‘मशाल’ पेटवली होती. त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी आज सत्तेवर असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसत असल्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपले मौन सोडावे आणि सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी प्रवीण दरेकर यांनी दुर्घटनास्थळी जाऊन हत्या झालेल्या साधु-महंतांना श्रद्धांजली देणार असल्याचे सांगितले.

The post शिवसेनेच्या हिंदुत्वावरुन प्रवीण दरेकरांनी पुन्हा एकदा साधला निशाणा! appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3x0aofM
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!