maharashtra

भयावह! काल दिवसभरात आढळले 2.34 लाख कोरोनाबाधित, तर 1341 जणांचा मृत्यू

Share Now


नवी दिल्ली : देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचे भयावह चित्र सध्या दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात शुक्रवारी 2.34 लाख नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर काल एकाच दिवसात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1341 लोकांचा जीव गेला आहे. त्याचबरोबर मागील 24 तासात 1.23 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तत्पूर्वी गुरूवारी देशात 2.17 लाख कोरोनाबाधितांची भर पडली होती. शुक्रवारची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता तो एक विक्रमच ठरला आहे.

गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला कोरोनामुळे 1290 रुग्णांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी 1341 रुग्णांचा मृत्यू झाल्याने ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. शुक्रवारी एकाच दिवसात देशात एकूण 30 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून देशात 45 वर्षावरील सर्व लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा आता करण्यात येतोय. गेल्या आठवड्यात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता.

दूसरीकडे शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 63,729 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 एवढे झाले आहे.

शुक्रवारी राज्यात 398 कोरोनाबाधितांच्या मत्युंची नोंद झाली असून राज्यातील मत्युदर 1.61 एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,38,034 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

The post भयावह! काल दिवसभरात आढळले 2.34 लाख कोरोनाबाधित, तर 1341 जणांचा मृत्यू appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tthHdN
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!