maharashtra

मलिकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पियुष गोयल यांची परखड शब्दांत टीका

Share Now


नवी दिल्ली – देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मोठ्या संख्येने वाढ होऊ लागले असल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले असतानाच रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लस तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

त्यातच आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर केंद्रातून थेट मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, असे ट्वीट पियुष गोयल यांनी केले आहे.


रेमडेसिवीर पुरवठ्यावरून नवाब मलिक यांनी टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी चार ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झाले. देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या आपण आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याचे पियुष गोयल म्हणाले आहेत.


गोयल यांनी पुढच्याच ट्वीटमध्ये राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवला जात असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्राला आत्तापर्यंत देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत असल्याचे गोयल म्हणाले आहेत.


पंतप्रधानांनी कालच घेतलेल्या आढाव्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी या संकटकाळात एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले होते. पण हे सगळे होत असताना उद्धव ठाकरेंकडून सुरू असलेले राजकारण पाहून दु:ख होत आहे. त्यांनी हे निर्लज्ज राजकारण थांबवले पाहिजे आणि जबाबदारी घेतली पाहिजे, असे गोयल यांनी म्हटले आहे.

सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या लोकांसाठी योग्य ते काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रातील नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारीचे योग्य पद्धतीने पालन करत आहेत. पण आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्य पाळून माझे राज्य, माझी जबाबदारी हे तत्व पाळण्याची वेळ आली असल्याचे म्हणत पियुष गोयल यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

The post मलिकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पियुष गोयल यांची परखड शब्दांत टीका appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2RxD9Af
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!