maharashtra

ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस आणि दरेकरांकडून पोलिसांची खरडपट्टी

Share Now


मुंबई – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना राज्य आणि केंद्र सरकारमध्ये यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. यादरम्यान विलेपार्ले पोलिसांना रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड या कारवाईची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यांनी यावेळी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारत पोलिसांची खरडपट्टी काढली.

पोलीस ठाण्यातील वादानंतर तेथील अधिकारी आणि भाजप नेते बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले होते. त्यांनी यावेळी ब्रुक फार्माविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर अखेर ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि कारवाई केली जाते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


रेमडेसिवीर महाराष्ट्राला मुबलक प्रमाणात मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला अचानक ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दुपारी एका मंत्र्यांचा ओएसडी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलिस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. पोलिस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या घटनाक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ब्रुक फार्मा कंपनीत जाऊन प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी रेमडेसिवीरसाठी विनंती केली होती. त्यांनी यावेळी परवानगी दिली, तर आमचा सगळा साठा महाराष्ट्राला देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्र्यांशी बोलून मी परवानगीसंदर्भात चर्चा केली. एफडीएकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या. दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. फडणवीस आणि दरेकरांच्या म्हणण्यावर तुम्ही इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब त्यांनी विचारला. पोलीस रात्री १० वाजता त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून घेऊन आले. रेमडेसिवीर महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जात असताना राजकारण सुरु आहे. महाराष्ट्राला मदत करण्यासाठी आम्ही काम करत असून, फक्त आम्ही करत आहोत म्हणून त्रास दिला जात असेल तर योग्य नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सध्या राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असून त्याचा मोठा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांनी त्याचा साठा केल्याच्याही तक्रारी आहेत. निर्यातबंदी झाली असून काही जणांकडे मोठ्या प्रमाणात याचा साठा आहे आणि ते निर्यात करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही एफडीएच्या मदतीने त्याची चाचपणी करत होतो. चौकशीसाठी आम्ही बोलावले होते आणि त्यानुसार आम्ही कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

भाजप नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे १२ एप्रिलला दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना ५० हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.

The post ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस आणि दरेकरांकडून पोलिसांची खरडपट्टी appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2QwZz4m
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!