maharashtra

गोष्ट रसाळ, मधाळ हापूस आंब्यांची…

Share Now


उन्हाळ्याची चाहूल लागली की कडक ऊन, त्याबरोबर शरीरातून अखंड वाहणाऱ्या घामाच्या धारा, ह्या नकोशा गोष्टींबरोबर, एक हवीहवीशी वाटणारी गोष्टही असते. किंबहुना दर उन्हाळ्यामध्ये आपण ह्याची आवर्जून वाट पाहत असतो. ही गोष्ट म्हणजे आंबे. आणि त्यातून आंबा ‘ हापूस ‘ असेल तर बातच और ! भारताच्या पश्चिम भागाची, म्हणजेच महाराष्ट्राची खासियत असलेला हा हापूस आंबा ‘समस्त आब्यांच्या जातींचा राजा’ म्हणून लौकिक मिळवून आहे, हे आपण जाणतोच. पण फार कमी लोकांना हे ठाऊक असेल, की ‘हापूस आंबा’ ही आंब्याची जात, रस काढून खाण्याऐवजी चिरून, फोडी करून खाता यावी ह्याकरिता अस्तित्वात आणली गेली.

हापूस किंवा मूळचा ‘अल्फोन्सो’ असलेल्या ह्या आंब्याला त्याचे नाव, पोर्तुगीज व्हाईसरॉय अल्फोन्सो दे अल्बुकर्क ह्यांच्या नावावरून देण्यात आले होते. ह्याच व्हाइसरॉयच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीझांनी गोव्यावर आपले अधिपत्य स्थापन केले आणि पोर्तुगीज साम्राज्याची आशिया खंडामध्ये पायाभरणी केली. हापूस आंब्याचे बोटॅनिकल नाव ‘मॅग्नीफेरा इंडिका’ असून, हे केवळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारे फळ आहे. ह्याचा इतिहासदेखील अनेक शतकांचा आहे.

आंबा ह्या फळाचा उल्लेख जरी उपनिषदांमध्ये, मौर्यकालीन ग्रंथांमध्ये, तसेच मुघलकालीन ग्रंथांमध्ये, प्रवासवर्णनांमध्ये सापडत असला, तरी आंब्याची ‘हापूस’ किंवा ‘अल्फोन्सो’ ही जात पंधराव्या शतकामध्ये पोर्तुगीझांच्या आगमनानंतर उगम पावली. ह्या जातीचे निर्माण खाद्यसंस्कृतीच्या देवघेवीतून झाले असल्याचे समजते. ज्याप्रमाणे टोमाटो, बटाटे, लाल मिरची, मका हे पदार्थ भारताबाहेरून येऊन येथे स्थायिक झालेल्या विदेशी लोकांबरोबर आले आणि त्यानंतर येथीलच होऊन राहिले, तसेच काहीसे हापूस जातीच्या आंब्यांचे ही आहे. पण ह्याबाबतीत अधिक शोधांच्या अभावी, दुर्दैवाने हापूस जातीच्या इतिहासाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही.

कृषी तज्ञांच्या मते, भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या आंब्याच्या जातींपैकी बहुतेक जातींचे आंबे हे रस काढून खाण्याचे किंवा चोखून खाता येतील असे होते. पण जेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये येऊन स्थायिक झाले, तेव्हा त्यांनी आंबे निर्यात करण्यास सुरुवात केली. तेव्हा निर्यात करण्याच्या दृष्टीने, लवकर खराब न होणारे आणि अगदी मऊ नसून, थोडे फार कडक असणारे आंबे असावेत असे त्यांना जाणविले. त्यामुळे त्याकाळच्या जेसुइट धर्मगुरूंनी निरनिराळ्या आंब्यांच्या जातींवर प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांनी ग्राफ्टींग सारख्या पद्धती वापरून १५५० ते १५७५ सालच्या दरम्यान ‘ हापूस ‘ ही आब्यांची जात निर्माण केली.

त्यांच्या ह्या प्रयोगाला यश येऊन त्यांनी तयार केलेल्या अनेक जातींच्या कलामांना भरपूर फळे आली. ह्या निरनिराळ्या जातींना अल्फोन्सो, रिबेलो, फर्नानडीना, फिलीपिना, पेरेस, अशी अनेक नावे देण्यात आली. ह्यापैकी अनेक जाती आता अस्तित्वात नाहीत. मात्र अल्फोन्सो किंवा हापूस मात्र नुसता टिकला नाही, तर जगभरात प्रसिद्धही झाला. पोर्तुगीझ धर्मगुरूंनी सुरु केलेले आंब्यांच्या झाडांचे ग्राफ्टिंगचे काम हळू हळू पोर्तुगीज सत्ता असलेल्या रत्नागिरी, कारवार ह्या भागांमध्येही होऊ लागले, आणि तिथे देखील हापूस आब्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. महाराष्ट्रामध्ये हापूस आंबे अनेक ठिकाणी होत असले, तरी रत्नागिरीचा हापूस खास आहे.

आज हापूस आंब्याला जगभरातून मोठी मागणी आहे. इतकेच काय, तर हापूस आंबे अमेरिकेत निर्यात व्हावेत आणि आणि अमेरिकेतून ‘हारले डेव्हिडसन मोटारसायकल्स’ भारतामध्ये निर्यात व्हाव्यात असा प्रसिध्द करार २००७ साली दोन्ही देशांनी केला. असा हा हापूस आंब्याचा महिमा !

The post गोष्ट रसाळ, मधाळ हापूस आंब्यांची… appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2OZ4f2l
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!