maharashtra

आपल्या मुलांशी संवाद साधताना…

Share Now


आपण आपल्या मुलांशी संवाद साधत असताना आपल्याही कळत नकळत मुले आपली भाषा, आपले विचार, आपली बोलण्याची पद्धत आत्मसात करीत असतात. त्यामुळे मुलांशी बोलताना किंवा त्यांच्यासमोर एखाद्या विषयाची चर्चा करताना आपण काळजी घेणे स्वाभाविक आहे. आपल्या मुलांशी संवाद साधताना आपल्या बोलण्यातून मुलांवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

एखाद्या कारणाने मुलांनी जर तक्रारीचा सूर धरला, किंवा खेळताना मुलांना थोडेसे लागले, तर मुले रडारड करतात. अश्यावेळी त्यांनी खेळताना काळजी घ्यावी, किंवा मुले तुमचे कसे ऐकत नाहीत, याबद्दल मुलांची कानउघडणी करण्याआधी मुलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीबद्दल त्यांची तक्रार असेल, तर त्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

मुले आपणहून एखादे काम करीत असली, आणि त्यामध्ये काही उणीवा राहिल्यास त्यासाठी त्यांना नावे ठेवणे आवर्जून टाळायला हवे. कामामध्ये मुले कमी पडत आहेत असे दिसले, तर ते काम पूर्ण करण्यासाठी मुलांना मदत करा. काम व्यवस्थित होण्यासाठी मुलांनी ते कसे करायला हवे याबद्दल मार्गदर्शन करा. प्रत्यक्षपणे मदत करता येणे शक्य नसले, तरी तुमच्या मार्गदर्शनामुळे मुलांना त्यांच्या कामामध्ये फायदाच होईल, तसेच कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना तुमच्याकडून मदत मिळेल असा विश्वास मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल. तसेच तुमच्या मदतीची मुलांना गरज असेल, तर मुले आपणाहून तुमच्याकडे येतील ह्याची खात्री बाळगा. त्यांना आवश्यकता नसताना त्यांच्या कामामध्ये अकारण दखल देऊ नका. त्यांचे प्रकल्प, अभ्यास त्यांचे त्यांना करण्यास प्रोत्साहन द्या.

तुम्ही कामामध्ये असताना जर मुले तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असली, तर त्यांच्यावर चिडू नका. तुमचे काम संपण्यासाठी किती वेळाची तुम्हाला आवश्यकता आहे, याबद्दल मुलांना कल्पना द्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याशी बोलाल असे आश्वासन त्यांना द्या. जर तुम्ही घराबाहेर कामानिमित्त असाल आणि मुले तुम्हाला वारंवार फोन करीत असतील, तर त्यांना तुमच्या कामाचे स्वरूप समजावून सांगा आणि मोकळा वेळ मिळताच त्याच्याशी संपर्क करण्याचे आश्वासन द्या.

मुलांच्या हातून एखादी चूक घडली, तर त्याबद्दल घरातील प्रत्येकाशी चर्चा करणे टाळा. मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे, पण त्यांनी केलेल्या चुकीचे भांडवल करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे मुलांनी केलेल्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करू नये. केलेल्या चुकीची चर्चा मुलांशी करून चूक कशी सुधारता येईल हे मुलांना समजावून सांगावे.

The post आपल्या मुलांशी संवाद साधताना… appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2QxtitY
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!