maharashtra

महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share Now


मुंबई – ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. पण परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात आहेत. दोन दिवसांत यासंबंधी निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी, माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे, याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सध्या पाहिजे त्या प्रमाणात संचारबंदीचा फायदा दिसत नाही. आपण अद्याप लॉकडाऊन केलेला नाही. लॉकडाऊनला अनेक व्यापाऱ्यांचा विरोध होता. पण आज १०० टक्के लॉकडाऊन करा अशी मागणी व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकाने असणारेही करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होत, लाट सौम्य येईल पण ही लाट तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. कडक लॉकडाऊन दिल्लीने केला असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. लॉकडाऊन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे, यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. दिल्लीच्या लॉकडाऊनचे स्वरुप काय आहे? लोकलसंबंधी काय निर्णय घेतला आहे? अत्यावश्यक सेवांना काय सूट दिली आहे? ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर राज्यातील लॉकडाऊनचे स्वरुप ठरवून नंतर घोषणा करण्याचा आमचा विचार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

यावेळी कोरोनाच्या लढाईसाठी ठाकरे सरकारने साडे पाच हजार कोटी रुपये राखीव ठेवले असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करायची असेल किंवा रेमडेसिवीर घ्यायचे असेल, ऑक्सिजन प्लांट लावायचा असेल, बेड्स वाढवायचे असतील या सगळ्यासाठी ३३०० कोटी आणि आमदारांना एक कोटी त्यांच्या निधीतून खर्च करायचा आहे. याशिवाय इतर स्त्रोतही असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

एसडीआरएफमध्ये कोरोनासाठी केंद्र सरकारने पैसे दिलेले नाहीत. गेल्यावेळी १२०० कोटी रुपये दिले होते. मागच्या वेळी ३ एप्रिलला पैसे आले होते, पण आज १९ एप्रिल असून अद्यापही पैसे आलेले नाहीत. हे टीका म्हणून नाही, पण उशीर झाला आहे. यावर्षी त्यांच्याकडून १६०० कोटी येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

The post महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2RI9hBj
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!