maharashtra

पात्र नसतानाही तन्मय फडणवीसने घेतलेल्या लसीच्या वादावर फडणवीसांचे स्पष्टीकरण

Share Now


मुंबई – सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये लसींच्या तुटवड्यावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचबरोबर लस उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक लसीकरणे केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली असताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याच्या फोटोची सोमवारी चर्चा रंगली होती.

तन्मय फडणवीस यामध्ये लसीचा डोस घेताना दिसत आहे. देशभरात सध्या ४५ वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसणाऱ्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.


कोरोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचे पालन केले पाहिजे, याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक असून कोणत्या निकषानुसार त्याला लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. हे जर नियमानुसार झाले असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण यात जर नियमावलीचे उल्लंघन झाले असेल तर हे अगदी अयोग्य आहे. त्याचबरोबर माझ्या पत्नी आणि मुलीलाही पात्र नसल्यामुळे लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे, हे माझे ठाम मत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

दरम्यान नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो तन्मय फडणवीसने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याने ही पोस्ट वाद झाल्यानंतर डिलीट केली. दरम्यान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, आमच्याकडे तन्मय फडणवीसने लसीचा दुसरा डोस घेतला. त्याने पहिला डोस मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये त्याला दुसरा डोस दिला.

The post पात्र नसतानाही तन्मय फडणवीसने घेतलेल्या लसीच्या वादावर फडणवीसांचे स्पष्टीकरण appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tzvgbM
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!