maharashtra

राज्यातील सर्वात मोठ्या लसीकरण केंद्राबाहेर झळकले व्हॅक्सिन आऊट ऑफ स्टॉक असा फलक

Share Now


मुंबई – मंगळवारी लस संपल्याचे फलक महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ झळकले. लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसींचे डोस संपल्यामुळे लस न घेताच घरी परतावे लागले. लसींचा पुरवठा संपल्याचे बोर्ड मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसीमधील लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यामुळेच या लसीकरण केंद्राबाहेर व्हॅक्सिन आऊट ऑफ स्टॉक असा बोर्ड झळकला आहे.

यासंदर्भातील माहिती एएनआयला या लसीकरण केंद्राचे प्रमुख असणाऱ्या राजेश डेरे यांनी दिली. ३५० ते ४०० कोव्हिशिल्डचे डोस केंद्रात होते. मंगळवार सकाळपासून येथे नोंदणी करुन येणाऱ्या नागरिकांना हे डोस देण्यात आले. पण त्यानंतर येथे लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे आता पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागणार असल्याचे डेरे यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस उपलब्ध असून ते आज दिवसभरात दिले जाणार असल्याचेही डेरे यांनी सांगितले आहे. आम्हाला संध्याकाळपर्यंत कोव्हिशिल्डचे डोस पुरवले जातील, असे सांगण्यात आले आहे. जर असे झाले, तर पुन्हा लसीकरण सुरु केले जाईल. कोव्हिशिल्डच्या लसी संपल्यासंदर्भात आम्हाला काल रात्री उशीरा माहिती मिळाली, असंही डेरे म्हणाले आहेत.

मंगळवार हा मुंबईतील लस टंचाईचा सलग तिसरा दिवस ठरला आहे. मुंबईत सोमवारीच ३१ खासगी लसीकरण केंद्र लससाठ्या अभावी बंद ठेवण्यात आली. दिवसभरात लसीकरणाचा वेग मंदावल्याचे चित्रही दिसून आले. केवळ ३५ हजार ३०९ लोकांचे लसीकरण सोमवारी करण्यात आले. त्यापैकी १० हजार लोकांनी लशीचा दुसरा डोस घेतला.

एकीकडे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण मुंबईत अद्याप पहिल्या दोन टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले नाही. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे व ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण वेगाने झालेले नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिकेने मुंबईतील केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण लससाठ्याअभावी हा वेग अद्याप कमीच आहे. सध्या लसीकरणासाठी मुंबईत १२९ केंद्र आहेत. त्यापैकी महानगरपालिकेची ३९, राज्य व केंद्र सरकारची १७ आणि खासगी रुग्णालयातील ७३ केंद्र आहेत. मात्र यापैकी ३१ केंद्र सलग दोन दिवस बंद ठेवावी लागली आहेत.

गेल्या आठवड्यापर्यंत मुंबईत ४० ते ५० हजार लोकांचे लसीकरण एका दिवसात होत होते. पण सोमवारी ३५,३०९ लोकांचेच लसीकरण होऊ शकले. खासगी केंद्रांवर जेमतेम ५८५८ लोकांचे लसीकरण होऊ शकले. आतापर्यंत मुंबईत २० लाखाहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख ६१ हजार नागरिकांना दोन्ही डास घेऊन झाल्या आहेत.

The post राज्यातील सर्वात मोठ्या लसीकरण केंद्राबाहेर झळकले व्हॅक्सिन आऊट ऑफ स्टॉक असा फलक appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/32uNlvJ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!