maharashtra

कोरोना नियमावलीचे पालन करा आणि देशाला लॉकडाऊनपासून वाचवा – नरेंद्र मोदी

Share Now


नवी दिल्ली – देशातीस कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यासोबतच या महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी देशवासीयांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी देशातील नागरिकांना धीर देतानाच कोरोनासाठी देश पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी देखील माहिती दिली.

सर्व कोरोना योद्धायांचे कौतुक करतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील तुम्ही आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवला होता. तुम्ही आज पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. या कठिणातल्या कठीण काळात आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला, तरच आपल्याला कोरोनाविरोधातील लढाईत विजय मिळू शकेल, असे मोदी यावेळी म्हणाले.

आपल्याला देशाला आजच्या स्थितीत लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे. लॉकडाऊनला राज्यांनी देखील अंतिम पर्याय म्हणून पाहावे. लॉकडाऊनपासून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण आर्थव्यवस्थेसोबतच देशवासियांच्या आरोग्याची देखील काळजी घेऊ या, असे मोदी यावेळी म्हणाले.

ऑक्सिजनचा पुरवठा देशातील काही राज्यांमध्ये अपुरा पडू लागला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याविषयी बोलताना मोदी म्हणाले, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोना काळात ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केले जात आहे. सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

यावेळी कोरोनाबाधित रुग्ण वाढताच आहेत. पण देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज देशातील सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातील तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे.

भारताने या सर्व पार्श्वभूमीवर दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातील गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेल्याचे म्हणत मोदींनी देशातील संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे कौतुक केले.

प्रयत्न हा आहे की अर्थव्यवस्था आणि रोजीरोटीवर कमीत कमी प्रभाव पडावा असाच सध्या प्रयत्न आहे. १८ वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध झाल्यामुळे श्रमिकांना लस उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारांनी मजुरांना विश्वास द्यावा की ते जिथे आहेत, तिथेच त्यांनी थांबावे. गेल्या वेळची परिस्थिती आत्तापेक्षा फार वेगळी होती. तेव्हा आपल्याकडे या संकटाशी लढण्यासाठी उपाय नव्हता. देशाने कोरोनाविरोधात आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने लढा दिला आहे. त्याचे श्रेय तुम्हा सगळ्यांना जाते.

लोकांनी या संकटकाळात अधिकाधिक पुढे यावे आणि देशवासीयांना मदत करावी. युवकांनी आपल्या सोसायटीमध्ये, परिसरात छोट्या छोट्या समित्या तयार करून कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी मदत करावी, आपण जर असे केले तर सरकारांना कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची गरजच पडणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

The post कोरोना नियमावलीचे पालन करा आणि देशाला लॉकडाऊनपासून वाचवा – नरेंद्र मोदी appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tEyvyO
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!