maharashtra

ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचे कंपनीच्या गाडीसह अपहरण

Share Now


आसाम – आसाममधील शिवसागर जिल्ह्यात असलेल्या लकुआ क्षेत्रातील रिंग साईटवरून नैसर्गिक वायू आणि तेल कंपनी अर्थात ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे कृत्य उल्फाच्या सशस्त्र बंडखोरांनी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. कर्मचाऱ्यांचे अपहरण ज्या गाडीतून करण्यात आले, ती सापडली असून, कर्मचाऱ्यांचा उद्याप शोध घेतला जात आहे.

ही माहिती ओएनजीसीच्या ट्विटर हॅण्डलवरुन काही ट्विट्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. दोन कनिष्ठ सहायक अभियंते आणि कनिष्ठ तंत्रज्ञ अशा तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी शिवसागर जिल्ह्यातील (आसाम) लकुआ येथील रिंग साईटवर ही घटना घडल्याचे कंपनी व्यवस्थापनानं म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांचे अपहरण करताना ओएनजीसीच्या गाडीचा अज्ञातांनी वापर केला. ही गाडी आसाम-नागालँडच्या सीमेजवळ आढळून आली. सीमेजवळ असलेल्या निमनगढ जंगलाजवळ अपहरकर्त्यांनी ही गाडी सोडून दिली. याप्रकरणी ओएनजीसी प्रशासनाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाने वरिष्ठांना दिल्यानंतर हालचालींना वेग आला असून, ओएनजीसी प्रशासन वरिष्ठ यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

या अपहरणामागे बंदी घातलेल्या यूनाटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (स्वतंत्र) अर्थात उल्फा-आय या संघटनेचा हात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, संशयित परिसरांना वेढा टाकण्यात आला असल्याची माहिती शिवसागरचे पोलीस अधीक्षक अमितवा सिन्हा यांनी दिली आहे.

The post ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचे कंपनीच्या गाडीसह अपहरण appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3txA69r
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!