maharashtra

नाशिकच्या मनपा रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

Share Now


नाशिक – एकीकडे ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे महाराष्ट्र अडचणीत आलेला असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्यामुळे २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. त्याचबरोबर अजून काही रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ही गळती ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

२२ रुग्णांचा ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. सरकारला देखील यासंदर्भातील माहिती कळवण्यात आली असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. या लिकेजमुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक प्रशानसनाने दिली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मनपा आयुक्तांनीही दिली होती. रुग्णालयात १५० रुग्ण होते, यापैकी २३ रुग्ण व्हेंटिलेटर आणि इतर रुग्ण ऑक्सिजनवर असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावेळी त्यांनी सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असे सांगितलं आहे. दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनपा आयुक्तच यासाठी जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यादरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस गर्दी कमी करत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. त्याचप्रमाणे नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

The post नाशिकच्या मनपा रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3goTW2Y
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!