maharashtra

पुनावाला यांनी जाहीर केली खुल्या बाजारातील कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत

Share Now


पुणे – भारत सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने स्वागत केले आहे. १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी देत असल्याची घोषणा सोमवारी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केली. आपण या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे ‘कोव्हिशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या या नव्या धोरणामुळे लसीकरणाची क्षमता वाढवता येईल, तसेच राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्राना थेट लस देता येईल, यासंदर्भात सीरमने समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर खुल्या बाजारात लसीची किंमत किती असेल याचीही माहितीही सीरमने दिली आहे. लसीच्या किंमतीसंदर्भात माहिती अदर पुनावाला यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

आम्ही लस निर्मिती क्षमता पुढील दोन महिन्यांमध्ये वाढवणार असल्याचे सीरमने स्पष्ट केले आहे. आम्ही उत्पादन घेत असणाऱ्या एकूण लसींपैकी ५० टक्के लसी या पुढे भारत सरकारसाठी राखीव असतील. भारत सरकारच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत या लसी वितरित करण्यात येतील. उर्वरित ५० टक्के लसी राज्य सरकारांना आणि खासगी रुग्णालयांना विकल्या जातील, असे सीरमने म्हटले आहे.

आम्ही केंद्र सरकारच्या आदेशानुसार लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना प्रत्येक लस ही ४०० रुपयांना दिली जाईल, तर खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येक लस ६०० रुपयांना विकली जाईल, असे सीरमने म्हटले आहे. त्याचबरोबर या पत्रकात जागतिक स्तरावरील लसींचा दर पाहता इतर लसींच्या तुलनेत स्वस्तात लस देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सीरमने स्पष्ट केले आहे. सीरमने केलेल्या दाव्यानुसार अमेरिकन लसीची भारतीय चलनानुसार प्रत्येक डोससाठी १५०० च्या आसपास आहे. रशियन लस ही ७५० रुपयांच्या तर चिनी लसही ७५० च्या आसपास उपलब्ध आहे.

लस निर्मिती आणि एकंदरित यंत्रणेवरील सध्याचा ताण पाहता सर्व खासगी कंपन्यांना सीरमने राज्यांच्या माध्यमातून किंवा खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लस घेण्याचे आवाहन केले आहे. चार ते पाच महिन्यांनंतर लस खुल्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सीरमने स्पष्ट केले आहे.

The post पुनावाला यांनी जाहीर केली खुल्या बाजारातील कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3xaKxBX
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!