maharashtra

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची १३ विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा

Share Now


मुंबई – नुकतेच कोरोना संदर्भातील नियम राज्य सरकारकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार आज रात्रीपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कोरोनाबाबतचे कठोर नियम लागू असणार आहेत. यामध्ये संचारबंदीचा देखील समावेश असल्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचे नियोजन देखील काहीसे विस्कळीत होण्याची शक्यता होती.

पण यासंदर्भात आता राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधील कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या उद्यापासून ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन, असे पर्याय देण्यात आले होते, विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरू देखील केल्या होत्या. पण, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

कोरोनाची पार्श्वभूमी आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. या परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना जर काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, उद्यापासूनच हा निर्णय लागू करण्यात येईल, असे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरू असून काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण त्या उद्यापासून शक्य नसल्यामुळे सर्वच कुलगुरुंनी सरकारला विनंती केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठांनी घ्यायची आहे. या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्गांच्या परीक्षांचा समावेश असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

The post उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची १३ विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3ncB1d5
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!