maharashtra

सर्वांसाठी लसीकरणाची नोंदणी ‘या’ तारखेपासून होणार सुरू ! अशा प्रकारे कराल नोंदणी

Share Now


नवी दिल्ली – नुकतीच १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार हे लसीकरण येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. पण, त्यासाठी एक आठवडा आधीपासून म्हणजेच २४ एप्रिलपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आधीप्रमाणेच कोविन अॅपवर ही नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असेल, असे केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने याआधीच्या टप्प्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले होते. आता १ मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.

केंद्र सरकारने नुकतीच देशात परदेशी लसींच्या वितरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे फायझर, मॉडेर्ना, स्पुटनिक या लसींचे डोस देखील भारतात लवकरच वितरीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रशियाची स्पुटनिक व्ही ही लस देखील १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये काही लसीकरण केंद्रांवर पर्याय म्हणून उपलब्ध असेल, असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले आहे. पण फायझर आणि मॉडेर्ना या लसींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

अशा प्रकारे कराल लसीकरणासाठी नोंदणी

  • तुम्हाला सर्वप्रथम cowin.gov.in संकेतस्थळावर जावे लागेल आणि तेथे तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
  • तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितलेले जागेत भरून Verify वर क्लिक करावा लागेल.
  • ओटीपी व्हॅलिडेट झाल्यानंतर लसीकरणासाठीच्या नोंदणीचे पेज उघडेल. येथे तुमची माहिती भरुन Register वर क्लिक करावे लागेल.
  • नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवर येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.
  • एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणे आवश्यक असेल.
  • तुम्हाला आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या माध्यमातून देखील नोंदणी करता येईल. यासाठी अॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचे नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.

दरम्यान केरळ, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. पण, तो निर्णय अद्याप महाराष्ट्रात घेण्यात आलेला नाही. बुधवारी सीरम इन्स्टिट्युटकडून कोव्हिशिल्ड लसीचे नवे दर जाहीर करण्यात आले असून त्यानुसार १ मेपासून राज्य सरकारांना कोव्हिशिल्ड लसीचा प्रत्येक डोस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना हेच डोस ६०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

The post सर्वांसाठी लसीकरणाची नोंदणी ‘या’ तारखेपासून होणार सुरू ! अशा प्रकारे कराल नोंदणी appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3nfl8T5
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!