maharashtra

लसीकरण जनजागृतीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची दुचाकीवरून भटकंती

Share Now


नंदुरबार : कोरोना लसीकरणाला गावातील नागरिकांचा विरोध…. गैरसमजामुळे नोंदणीला मिळणारा नकार…. दुर्गम डोंगराळ भाग…. साधनांच्या मर्यादा….. यापूर्वीच्या प्रयत्नात आलेले अपयश….. अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना अक्कलकुवा तालुक्यातील चिखली येथील जि.प. शाळा पाटीलपाडाचे मुख्याध्यापक दिपक वसावे यांना अभिनव कल्पना सुचली. ‘गुरुजीं’चा अनुभव उपयोगात आला आणि ‍चिखली गावात 4 नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी झाली.

चार ही संख्या मोठी नसली तरी प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयत्नांची आणि त्यामुळे झालेल्या बदलाची निदर्शक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे काम शिक्षकांमार्फत करण्यात येत आहे. बऱ्याच गावात लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने आधी ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्त्व समजावून त्यांचे नोंदणीसाठी सहकार्य मिळविणे मोठे आव्हान आहे. शिक्षकांनी अत्यंत संवेदनशीलतेने हे काम लिलया करीत लसीकरणाला वेग देण्यासाठी चांगली मदत केली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुभवदेखील काही वेगळा नाही. काही ठिकाणी लसीकरण म्हणताच दार बंद केले जाते किंवा बाहेरचा व्यक्ती घरात येऊ नये ही ताकीद देण्यात येते. मुलांना समस्येवर मात कशी करायची याचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी आपल्या याच अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग करीत जनजागृतीचे काम सुरू ठेवेले आहे. अशाच एका ‘मास्तरा’ने आपली दुचाकी काढली. दररोज प्रार्थनेसाठी घेतलेला ध्वनीक्षेपक बंद होता. जनतेला प्रसन्न करण्यासाठी तो गाडीवर ठेवला आणि स्वारी पोहोचली पाड्यावर….. घराबाहेर न येणारे ग्रामस्थ गोळा झाले आणि सुरू झाला जनजागृतीचा तास……

वसावे यांनी मित्राशी चर्चा करून ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे निश्चित केले. स्वत:च्या मोटर सायकलवर ध्वनीक्षेपक आणि माईक घेऊन गुरुवारी पाटीलपाड्यावर पोहोचले. अजूनही ग्रामीण भागात ध्वनीक्षेपकाचे आकर्षण असल्याने विखूरलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ घरातून बाहेर पडत ऐकू लागले. संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी वसावे यांनी स्थानिक भाषेचा उपयोग केला. त्यामुळे त्यांना प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे.

लसीकरणाचे फायदे, लसीकरण कुठे सुरू आहे, लसीकरणासाठी वयाची पात्रता, लस घेऊन आल्यावर घ्यावयाची दक्षता, मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन आदी बाबी दुर्गम भागात पोहोचल्या. शेवटी त्यांनी लसीकरणासाठी आव्हान केले. 4 नागरिक तयार झाले. त्यांनी ही संधी न दवडता मोबाईल कव्हरेजसाठी जवळची टेकडी गाठली. आधार कार्डच्या सहाय्याने नोंदणी केली. समाधानाने स्वारी 29 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या खापर गावाकडे परतली….. दुसऱ्या दिवशी पुढच्या पाड्यावर जायचे आणि परिसरातील दोन-तीन गावात लसीकरण शिबीर भरवायचेच हा निश्चय मनाशी बांधून…….

नागरिकांना माहिती दिल्यावर ते प्रतिसाद देतात. काही ठिकाणी मोटार सायकल ठेऊन पायी जावे लागते. पण नागरिक लसीकरणासाठी तयार झाल्यावर थकवा जाणवत नाही अशा शब्दात वसावे यांनी आपल्या पहिल्या दिवसाचा अनुभव व्यक्त केला आहे. त्यांना गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी आणि मुख्याध्यापक सुनील मावची यांचे सहकार्य लाभले आहे.

रमेश देसले, गटशिक्षणाधिकारी-अत्यंत संवेदनशील आणि हुशार शिक्षक असे वसावे यांचे वर्णन करता येईल. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्यांचा भर असतो. उपक्रमशील आणि अभ्यासू शिक्षक आहेत. झोकून देऊन काम करण्याची त्यांची पद्धत या उपक्रमातही दिसून येते. जनतेचा प्रतिसाद ते मिळवतील याची खात्री आहे.

The post लसीकरण जनजागृतीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची दुचाकीवरून भटकंती appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3gPmBON
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!