maharashtra

तुम्ही ‘इमोशनल इटिंग’च्या आहारी तर गेला नाही ना?

Share Now


अनकेदा काही व्यक्ती स्वतःच्याच नकळत, भूक नसतानाही जे समोर दिसेल ते पदार्थ खात असतात. विशेषतः चॉकोलेट्स, आईसक्रीम, चटपटीत मसालेदार स्नॅक्स, किंवा एखादी मिठाई हे पदार्थ खाण्याकडे या मंडळींचा कल असतो. हे पदार्थ खात असताना त्यांना भूक लागली असेलच असे नाही, तरीही स्वतःच्या नकळत हे लोक असे पदार्थ प्रमाणाबाहेर जास्त खाऊ लागतात. स्वत:च्या प्रमाणाबाहेर जास्त खाण्यावर या व्यक्ती नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. अशा व्यक्ती बहुतेकवेळी ‘इमोशनल इटिंग’च्या आहारी गेलेल्या असतात.

आपल्या मनामध्ये भरून राहिलेल्या नकारात्मक भावनांना वाट मोकळी न करून देता त्या भावना मनामध्येच दाबून ठेवल्याने उत्पन्न होणाऱ्या मानसिक तणावापायी काही व्यक्ती प्रमाणाबाहेर जास्त अन्न, भूक नसतानाही खाऊ लागतात. यालाच मानसशास्त्रज्ञ ‘इमोशनल इटिंग’ म्हणतात. या मनातील नकारात्मक भावनांमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये साठून राहिलेला राग, दुःख, कामाचा ताण, भीती अशा अनेक भावनांचा समावेश असू शकतो.

त्याचबरोबर कौटुंबिक समस्या, जोडीदाराशी नातेसंबंधांमध्ये तणाव, कामाच्या ठिकाणी मतभेद, करियरच्या विषयी मनामध्ये सतत असणारी चिंता, आरोग्याशी निगडित काही काळज्या अशा ही कारणांमुळे इमोशनल इटिंगची समस्या उद्भवू शकते. अशा वेळी व्यक्ती स्वतःच्याही नकळत किंवा कधी जाणून बुजूनही प्रमाणाबाहेर जास्त खाऊ लागल्याने वजन वाढणे आणि तत्सम समस्या सुरु होतात.

इमोशनल इटिंगवर नियंत्रण ठेवणे काहीसे कठीण असू शकते. कारण बहुतेकवेळी सबंधित व्यक्ती स्वतःच्याही नकळत इमोशनल इटिंगच्या आहारी गेलेल्या असतात. अशा व्यक्ती आपल्या मनावरील तणाव कमी करण्यासाठी सतत खात राहतात. नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी सतत खाणे हाच उपाय असल्याचे या व्यक्तींना वाटत असते. किंबहुना सतत गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या मनामधील नकारात्मक भावना आणि तणाव कमी होत असल्याची या व्यक्तींची खात्री पटलेली असते. अशा वेळी इमोशनल इटिंगच्या आहारी गेलेल्या या व्यक्तींच्या भुकेशी, जास्त खाण्याचा काही संबंध नसल्याचे लक्षात घेऊन, या व्यक्तींच्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या मनामधील नकारात्मक भावना ओळखून त्या कशा कमी करता येतील हे पाहणे आवश्यक असते. जर त्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत बोचत राहणारी नकारत्मक भावना कमी झाली, तर त्या भावनेच्या तणावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरु झालेले इमोशनल इटिंगही नियंत्रणात येण्यास मदत होते.

The post तुम्ही ‘इमोशनल इटिंग’च्या आहारी तर गेला नाही ना? appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3vvPrba
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!