maharashtra

चीनमधील हा खडक दर तीस वर्षांनी देतो ‘अंडी’ !

Share Now


आपल्या जगामध्ये आपण आश्चर्य करीत रहावे अशा अनेक गोष्टी आहेत. ‘ऐकावे तितके नवल’ असे वाटायला लावणाऱ्या या गोष्टी असून, अनेकदा या गोष्टी अस्तित्वात असल्याचे आपल्या गावीही नसते. अशाच गोष्टींपैकी एक आहे चीन देशातील एक भला थोरला खडक. आजवर आपण प्राण्यांना किंवा पक्ष्यांना अंडी देताना पाहिले, ऐकले असेल, पण पाषाणाने बनलेला हा खडक ‘अंडी’ देतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. एरव्ही देखील चीन हा देश निरनिरळ्या अजब वस्तूंसाठी प्रसिद्ध आहेच. याच देशामध्ये हा ‘अंडी’ देणारा खडक अस्तित्वात आहे.

दक्षिण-पश्चिमी चीनमधील गिझोऊ प्रांतामध्ये हा खडक उभा आहे. या खडकाची उंची सुमारे वीस मीटर असून, हा सहा मीटर रुंद आहे. या खडकाला चीनमध्ये ‘चन दन या’ या नावाने ओळखले जाते. या खडकाचा रंग काळा असून, दर तीस वर्षांनी या खडकामधून अंडाकृती दगडांची निर्मिती होत असते. या खडकातून अंडाकृती दगड कसे बाहेर पडतात हे आजवर कोणालाही न उलगडलेले रहस्य असून, याच कारणास्तव हा खडक जगभरामध्ये रहस्यमयी समजला जात आहे. या खडकातून निर्माण होणारे अंडाकृती दगड आधी एका तेलकट कवचामध्ये खडकावरच चिकटून असतात, आणि काही काळानंतर कवच फोडून ही पाषाणरूपी अंडी जमिनीवर पडून जातात. हे नेमके कशामुळे घडते याचे रहस्य जगभरातील वैज्ञानिकांनाही अद्याप उलगडलेले नाही.

या खडकाच्या ‘चन दन या’ या नावाचा अर्थ ‘अंडी देणारा खडक’ असा आहे. या खडकापासून तयार होणाऱ्या अंडाकृती दगडांना स्थानिक रहिवासी शुभ मानतात. जेव्हा ही पाषाणरूपी अंडी कवच फोडून जमिनीवर पडतात, तेव्हा स्थानिक निवासी हे दगड आपल्या घरांमध्ये नेऊन ठेवतात. ‘चन दन या’ हा खडक केवळ ‘अंडी’च देत नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून या खडकाचा आकारही बदलत आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या अनुसार हा खडक अनेक मिलियन वर्षांपूर्वीचा असून, हवामानामध्ये सातत्याने होत असणाऱ्या बदलांमुळे या खडकाला कधी उच्चांकी तर कधी नीचांकी तापमान सोसावे लागते, ज्यामुळे याच्या संरचनेमध्ये सातत्याने फरक येत असतो. म्हणूनच या खडकाचा आकार सतत बदलत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. खडकाचा आकार कशामुळे बदलत असेल याचे अनुमान जरी वैज्ञानिकांनी लावले असले, तरी हा खडक पाषाणरूपी अंडी कशी काय देऊ शकतो हे मात्र आजतागायत रहस्य बनून राहिले आहे.

The post चीनमधील हा खडक दर तीस वर्षांनी देतो ‘अंडी’ ! appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3taf1AM
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!