maharashtra

मधुमेहापासून थायरॉइड पर्यंत सर्वच आजारांसाठी उपयुक्त असे हे आसन

Share Now


सर्वांगासन हे असे आसन आहे, ज्यामुळे ‘सर्वांग’, म्हणजेच शरीरातील प्रत्येक अवयवाला लाभ होत असतो. हे आसन करताना पाठीवर उताणे झोपून पाय कंबरेपासून सरळ वर उचलून धरायचे असतात. या आसनामध्ये केवळ खांदे, मान आणि डोके जमिनीला टेकलेले असून, शरीराचा बाकी हिस्सा सरळ वरच्या बाजूला उचललेला असतो. या आसनामुळे शरीराच्या सर्वच अवयवांना लाभ होतोच, शिवाय स्नायूंचे उत्तम टोनिंग करणारे आणि स्नायूंना बळकटी देणारे असे हे आसन आहे. हे आसन करीत असताना पाय कंबरेतून सरळ वर उचलले जात असतात, तेव्हा श्वास सोडायचा असून, हे आसन संपवून पाय जमिनीवर आणताना खोल श्वास घ्यायचा आहे. हे आसन सर्वांसाठी अतिशय लाभदायक असले, तरी महिलांनी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ही आसन करणे टाळावे.

हे आसन करणे सुरुवातीला जरी अवघड असले, तरी सरावाने हे आसन साध्य होऊ शकते. सुरुवातीला कंबरेखाली एखादी जाड उशी किंवा लोड ठेऊनही हे आसन करता येऊ शकते. जसजसा सराव वाढत जाईल, तसतसे हे आसन करणे सहज साध्य होऊ शकेल. हे आसन शरीराच्या संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असून, या आसनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. हे आसन करीत असताना रक्तप्रवाह मेंदूकडे जात असल्याने यामुळे मेंदू अधिक सक्रीय राहण्यास मदत होते. सर्वांगासानाच्या नियमित सरावाने शरीराची पाचनक्रियाही सुरळीत राहते. ज्यांना पचनाशी निगडित समस्या असतील, किंवा बद्धकोष्ठ असेल त्यांनी नियमित या आसनाचा सराव केल्याने फायदा होतो.

ज्यांना पाठीचे किंवा मानेचे दुखणे असेल त्यांनीही जितके जमेल तितके या आसनाचा सराव करावा. या आसनामुळे पाठीच्या कण्याला बळकटी मिळण्यास मदत होत असून, जर हे आसन योग्य पद्धतीने केले गेले तर यामुळे मानेच्या आणि पाठीच्या कमकुवत झालेल्या स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते. या आसनाचा लाभ स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजननक्षमतेसाठी होत असतो. ज्यांना वजन घटवायचे आहे, त्यांच्यासाठी देखील हे आसन उपयुक्त आहे. यामुळे वजन सावकाशीने पण कायमस्वरूपी घटण्यास मदत होत असते. हे आसन नियमित केल्याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हल्स नियंत्रित राहत असल्याने हे आसन मधुमेहींना अतिशय फायदेशीर आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे ‘पॅनक्रियाज्’ चे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.

या आसनाच्या नियमित सरावामुळे निद्रानाशाचा विकार पुष्कळ प्रमाणात कमी होण्यास मदत होते. तसेच या आसनामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत असल्याने त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हे आसन उपयुक्त आहे. या आसनामुळे चेहऱ्यावर तजेला येऊन डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे नाहीशी होण्यास मदत होते. या आसनामुळे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी सक्रीय होत असल्याने हायपो- आणि हायपरथायरॉईडीझम च्या रुग्णांसाठी हे आसन उपयुक्त ठरते. सुरुवातीला हे आसन करताना तज्ञांच्या देखरेखीखाली केले जाणे आवश्यक आहे. एकदा हे आसन सहज साध्य झाले, की मगच याचा नियमित सराव केले जाणे इष्ट आहे.

The post मधुमेहापासून थायरॉइड पर्यंत सर्वच आजारांसाठी उपयुक्त असे हे आसन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3xFlSWm
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!