maharashtra

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडेच नाही, तर इतर अवयवही होतात कमजोर

Share Now


शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली, की याचा परिणाम हाडांवर, दातांवर होत असतो, हे सर्वश्रुत आहे. पण कॅल्शियमची गरज केवळ हाडांनाच नाही, तर इतर अवयवांनाही तितकीच असते, हे लक्षात घेणे अगत्याचे असते. आपल्या शरीरातील नव्वद टक्के कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये असते. या शिवाय शरीरातील कोशिका, नर्व्हज, रक्तप्रवाह, स्नायू आणि हृद्य हे सर्व सुरळीत काम करावेत यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. इंटरनॅशनल ऑस्टीयोपोरोसीस फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये भारतातील लोकांच्या आहारामध्ये कॅल्शियमचे प्रमाण आवश्यक मात्रेपेक्षा कमी असल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतामध्ये अधिकाधिक लोकांच्या बाबतीत हाडे कमकुवत होत असल्याचे निदान केले जात आहे.

शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता जास्त काळाकरिता असेल, तर याचा थेट प्रभाव दातांवर आणि मेंदूच्या कार्यावर होत असतो. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दृष्टीदोष उत्पन्न होण्याचा धोका संभवत असून, मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. संधिवात, हाडांची झीज या समस्याही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवतात. सुरुवातीला कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे दिसून येत नसली, तरी सतत सांधे दुखी, अंगदुखी, हे सामान्यपणे आढळून येणारे लक्षण आहे. जसजशी कॅल्शियमची कमतरता वाढत राहते, तसतशी ही लक्षणे अधिक दिसून येऊ लागतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टीयोपोरोसीस हा विकार उद्भवतो. यामध्ये हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ लागतात. अगदी किरकोळ मार लागल्याने देखील हाड मोडण्याचा धोका अशा वेळी उद्भवतो. त्याचप्रमाणे कॅल्शियमची कमतरता असले, तर महिलांना मासिक पाळीच्या वेळी भयंकर वेदनांना तोंड द्यावे लागते. ही समस्या नाहीशी करण्यासाठी आपल्या आहाराद्वारे कॅल्शियम घेण्याखेरीज दोन महिने सातत्याने कॅल्शियमची औषधे घेतल्यानेही फरक दिसून येत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच कॅल्शियमच्या सप्लिमेंट घेतल्याने शारीरिक थकवा, नैराश्य, भूक कमी लागणे इत्यादी समस्याही कमी होत असल्याचे तज्ञ म्हणतात.
शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली, की त्याचा प्रभाव दातांवरही पडतो. दात ठिसूळ होणे, तुटणे, हलू लागणे, हिरड्यांशी निगडित समस्या सुरु होतात. त्याचबरोबर नखे कमजोर होणे, तुटू लागणे, नखांवर पांढरे डाग पडणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेला सतत खाज सुटणे इत्यादी समस्याही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवतात. बहुतेकवेळी व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाते, तसतशी कॅल्शियमची कमतरता शरीरामध्ये वाढत जाते. तसेच लहानपणापासून आहारामध्ये कॅल्शियमने परिपूर्ण अन्नपदार्थांचे सेवन केले गेले नसले, तरी त्याच्या परिणामस्वरूप नंतर शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. त्याचबरोबर ब्रोकोली, कोबी, भेंडी, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. ओव्याची पाने आणि फुले, तुळशीचे बी यांमध्येही कॅल्शियम मुबलक मात्रेमध्ये आहे. त्याच्या जोडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लिमेंटही योग्य मात्रेमध्ये घेणे लाभकारी ठरते.

The post कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडेच नाही, तर इतर अवयवही होतात कमजोर appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3aWgfcK
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!