maharashtra

तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुचेरी… कुणाला मिळाल्या सत्तेच्या चाव्या?

Share Now


नवी दिल्ली – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आव्हान परतवून लावत दणदणीत मुसंडी मारली आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये सत्तांतराची लाट बघायला मिळाली आहे. तामिळनाडूतील मतदारांनी द्रमुकच्या हाती सत्ता सोपवल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. द्रमुक १३९ जागी आघाडीवर आहे. तामिळनाडूत बहुमताचा आकडा ११८ इतका आहे.

दुसरीकडे केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन नवा इतिहास नोंदवला आहे. विजयन यांना सलग दुसऱ्यांदा सत्तेची संधी मतदारांनी दिली आहे. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ ९२ जागांवर आघाडीवर आहे. तर तिकडे पुदुचेरीत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.

पुदुचेरीत बहुमतासाठी १६ जागा आवश्यक असून, सध्या भाजप ९, तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये मात्र, भाजपने आपली सत्ता राखली आहे. सध्या भाजपने ७७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४८ जागांवर आघाडीवर आहे.

  • केरळ – पश्चिम बंगाल वगळता इतर तीन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमत दिले आहे. एलडीएफने ९३ जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. यूडीएफ ४३ जागांवर आघाडीवर आहे.
  • आसाम – आसाममध्ये भाजपने दणदणीत घरवापसी केली आहे. काँग्रेस आणि भाजपत चुरस होती. मात्र, भाजपने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. भाजपने बहुमताचा आकडा पार करत ७७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला स्पष्ट जनमत मिळताना दिसत आहे.
  • तामिळनाडू – सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात तामिळनाडूमध्ये लढत बघायला मिळाली. सुरूवातीला दोन्ही आघाड्यांमध्ये अटीतटीची लढत सुरू झाली. पण, नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूतील जनतेने द्रमुकच्या पदरात मते टाकत स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. द्रमुक १४१ जागी आघाडीवर आहे. तर सत्ताधारी अण्णाद्रमुक ८९ जागांवर आघाडीवर आहे.
  • पुदुचेरी – दुपारनंतरही ३० सदस्यसंख्या असलेल्या पुदुचेरी विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झालेले नाहीत. पुदुचेरीत कुणाची सत्ता येणार याचा सस्पेन्स कायम असून, भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने ६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे पुदुचेरीतील चित्र स्पष्ट होण्यासाठी मध्यरात्र होण्याची शक्यता आहे.

The post तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुचेरी… कुणाला मिळाल्या सत्तेच्या चाव्या? appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3nHywQ1
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!