maharashtra

आयपीएलवर कोरोनाचे सावट; कोलकात्याचे खेळाडू बाधित; आजचा सामना ढकलला पुढे

Share Now


नवी दिल्ली – आज आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. पण दोन खेळाडूंना या सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळे सामना पुढे ढकलण्यात आला आहे. खेळाडूंच्या गोटात कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाच्या सावटाखाली आयपीएल स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच या स्पर्धेसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली. पण तरीदेखील खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाची कोलकाता संघातील दोन खेळाडूंना लागण झाल्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाही. वरुण आणि संदीपची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला दिली.

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले आहेत. आज बंगळुरुचा संघ कोरोना फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांसाठी निळ्या जर्सीसह मैदानात उतरणार होता. या जर्सीचा लिलाव करून मिळालेल्या पैशांतून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत केली जाणार आहे.

The post आयपीएलवर कोरोनाचे सावट; कोलकात्याचे खेळाडू बाधित; आजचा सामना ढकलला पुढे appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3t8uAsQ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!