maharashtra

मुंबईत ७५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत आटोक्यात येऊ शकतो कोरोना मृत्यूदर

Share Now


मुंबई – मुंबईमधील कोरोनाबाधितांच्या दुपटीचा कालावधी हा सरासरी शंभर दिवसांवर पोहोचला असून कोरोनाबाधितांच्या वाढीचा दर ०.६६ टक्क्यांवर घसरला आहे. मुंबईत जरी दैनंदिन रुग्णसंख्या कमी झालेली असली, तरी कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

गेल्या २४ तासांत मुंबईत ३,६७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७९ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अभ्यासानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढणार असल्याचे सागंण्यात आले आहे. पण, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, शहरात जर ७५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत कोरोना मृत्यूदर आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

महिन्याभरात मुंबईमध्ये २० लाख नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, तरच जून महिन्यापर्यंत मृत्यूदर कमी होण्याची शक्यता आहे. १ जुलै किंवा त्यानंतर लवकरच शाळासुद्धा सुरु करता येऊ शकतात, असे टीव्हीएफआरचे अधिष्ठाता डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले. पण हे पूर्वानुमान असल्यामुळे यामध्ये चूक होण्याची देखील शक्यता आहे. या सर्वांचे मूल्यांकन जुलै महिन्याच्या जवळपास करता येईल, असेही जुनेजा म्हणाले.

दुसऱ्या लाटेसाठी कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव हा कारणीभूत ठरला आहे. त्याचा अधिक प्रसार लोकल सुरू झाल्यानंतर सुरू झाला. मुंबई व महाराष्ट्रातील अन्य मोठ्या जिल्ह्यांमध्ये हा नवीन विषाणू फेब्रुवारीमध्ये वेगाने पसरत गेला. जसजशी लोकांची आणि गाड्यांची गर्दी रस्त्यांवर वाढत गेली, तसतसा कोरोनाचा प्रसार वाढत गेला आणि त्यामुळे दुसरी लाट आली, असे टीआयएफआरनं म्हटले आहे. पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर अशा इतर जिल्ह्यांतील दुसरी लाट ही मुंबईमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसारखीच असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

The post मुंबईत ७५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत आटोक्यात येऊ शकतो कोरोना मृत्यूदर appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3uglhZk
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!