maharashtra

पश्चिम बंगालमध्ये ज्या-ज्या ठिकाणी राहुल गांधींनी प्रचारसभा घेतल्या त्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Share Now


नवी दिल्ली – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालामध्ये तिसऱ्या आघाडीच्या वाटेला केवळ एक जागा आल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या आघाडीला पश्चिम बंगालच्या जनतेने पूर्णपणे नाकारल्याचे यावरुनच लक्षात येत आहे की तिसऱ्या आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी ८५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. त्याचबरोबर राहुल गांधींनी ज्या दोन मतदारासंघांसाठी प्रचारसभा घेतल्या, त्या दोन्ही मतदारसंघांमध्येही काँग्रेसचा पराभव झाला.

तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांपैकी केवळ ४२ उमेदवारांना अनामत रक्कम जप्त न होण्याएवढी मते मिळाल्याचे वृत्त न्यूज १८ने दिले आहे. तिसऱ्या आघाडीने निवडणुकीत सर्वच्या सर्व २९२ जागा लढवल्या होत्या. तिसऱ्या आघाडीतील सदस्य पक्ष असणाऱ्या भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाने काँग्रेस आणि डाव्या घटक पक्षांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये एका जागेवरही काँग्रेस आणि डाव्या पक्षांना विजय मिळवता आलेला नाही. राहुल गांधी यांनी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत शेवटच्या काही टप्प्यांमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभा न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. देशामध्ये एप्रिलच्या मध्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याचे पहायला मिळाले. पण त्यापूर्वीच राहुल यांनी दोन ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या होत्या.

मागील एका दशकापासून माटीगारा-नक्सलबाडी मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र स्थानिक आमदार असणाऱ्या शंकर मालाकार यांना केवळ ९ टक्के मत यंदा मिळाली. ते तिसऱ्या स्थानी राहिले. गोलपोखरमध्येही काँग्रेच्या उमेदवाराला केवळ १२ टक्के मते मिळवता आली. येथेही काँग्रेस तिसऱ्या स्थानीच राहिली. सन २००६ पासून २००९ पर्यंत आणि नंतर २०११ पासून २०१६ पर्यंत गोलपोखरमधून काँग्रेसचा आमदार विधानसभेत गेला होता. माटीगारा-नक्सलबाडीमधून यंदा भाजपचे आनंदमय बर्मन हे ७८ हजार ७६४ मतांसहीत निवडून आले. तर गोलपोखरमधून तृणमूलचे गुलाम रब्बानी निवडणूक जिंकले.

तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांचे वेगवेगळे विश्लेषण केले तर १७० पैकी केवळ २१ जागांवर डाव्यांना आपली अनामत रक्कम वाचवता आली. काँग्रेसने लढवलेल्या ९० जागांपैकी ११ जागांवर उमेदवारांना अनामत रक्कम वाचवात आली. उरलेल्या ३० पैकी १० जागांवर भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाच्या उमेदवारांनी अनामत रक्कम वाचवली. भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाने एक जागा जिंकली तर चार जागी त्यांचा उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिला. याच चार ठिकणी भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाला भाजपपेक्षा जास्त मते मिळाली. यावरुन तिसऱ्या आघाडीमधील फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांनी स्थापन केलेल्या भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाबद्दल लोकांना आकर्षण असल्याचे दिसून आले.

केवळ चार जागी डाव्या विचारसरणीचा पक्ष दुसऱ्या ठिकाणी राहिला. तर काँग्रेस जॉयपुर आणि रानीनगर या दोनच मतदारसंघांमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला. तिसऱ्या मोर्चाला मिळालेल्या अपयशाचा थेट फायदा तृणमूल काँग्रेसला झाला. तृणमूलने एकूण २१३ जागांवर विजय मिळवला. एकंदरीत काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये केवळ २.९४ टक्के मते मिळाली. तर डाव्यांना पाच टक्के लोकांनी मतदान केल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे.

The post पश्चिम बंगालमध्ये ज्या-ज्या ठिकाणी राहुल गांधींनी प्रचारसभा घेतल्या त्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3edOPRF
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!